रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

By Admin | Published: December 18, 2014 04:27 AM2014-12-18T04:27:52+5:302014-12-18T04:27:52+5:30

गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने पर्दाफाश केला

Black marketing rationing exposed | रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

googlenewsNext

पुणे : गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने पर्दाफाश केला असून, स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. कोंढव्यातील एका गोडावूनवर छापा टाकत काळ्याबाजारात जाणारा तब्बल ७७ लाख ५ हजार ५५० हजारांचा रेशनिंगचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये तांदळाची १३७६ पोती आणि २३६ पोती गहू जप्त केल्याची माहिती युनिट तीनचे निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
विक्रम गणपत रोकडे (२७, रा. मार्केटयार्ड), सचिन महादेव नवले (२३, रा. काळेपडळ), मंगेश बाळासाहेब कामठे (२९, रा. तक्रारवाडी), संदीप लहू गायकवाड (४०, रा. पिंगोरी), नरसिंग गुलाबराव जगताप (५५, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात पुरवठा निरीक्षक अजित शांताराम गांगडे (५२,रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री बिबवेवाडी येथे झालेल्या खुनाच्या तपासासाठी युनिट तीनचे सहायक निरीक्षक बाबर आणि त्यांचे सहकारी मंगळवारी पहाटे फिरत होते. त्या वेळी त्यांना गंगाधाम चौकामध्ये संशयास्पद अवस्थेत उभा केलेला ट्रक दिसला. त्याच्या चालकाकडे चौकशी केल्यावर, त्याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर, त्याने ट्रकमध्ये रेशनिंगच्या दुकानातून काळ्या बाजाराने आणलेली धान्याची पोती असल्याची माहिती दिली.
माल घेऊन जात असलेल्या गंगाधामजवळील गोडावूनवरही पोलिसांनी छापा टाकला. हे गोडावून रोकडे आणि कसवेच्या मालकीचे आहे. गोडावूनमध्ये एकूण चार ट्रक उभे होते. यातील दोन ट्रकमधील माल उतरवण्यात आलेला होता, तर दोन ट्रकमध्ये माल भरलेला होता. या चारही ट्रकमध्ये एकूण ७७ लाख ५ हजार ५५० रुपयाचा माल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या पोत्यांवर शासकीय शिक्के मारलेले आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त जयंत नाईकनवरे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत.

Web Title: Black marketing rationing exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.