पुणे : भाजपाच्यावतीने संपूर्ण शहरात रविवारी दिवसभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व ४१ प्रभागांमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानात पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सर्व इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्रपणे स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. शहरातील रस्ते व परिसर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. या अभियानात पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पक्षाचे आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग नोंदविला. स्वच्छता अभियानासाठी खास रविवारचा दिवस निवडण्यात आला होता. सकाळी सात वाजल्यापासून या अभियानास सुरुवात करण्यात आली. प्रभागातील प्रमुख रस्ते, गल्ली बोळ आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. सर्व प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे तिथले रस्ते आणि परिसर चमकू लागला होता. स्वच्छता अभियानाची सांगता झाल्यानंतर उमेदवारांनी पदयात्रा काढल्या, त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. रविवारच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपाच्या उमेदवारांकडून करण्यात आला. (प्रतिनिधी)
भाजपाचे स्वच्छता अभियान
By admin | Updated: February 13, 2017 02:31 IST