पिंपरी : उमेदवारीची समीकरणे जुळवाजुळवीसाठी भाजपा आणि शिवसेनेने केलेली ‘फिक्सिंग’ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. लोकसभा, विधानसभा आणि कॅन्टोन्मेट निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोधैैर्य खचले होते. पोटनिवडणुकीच्या अनुकूल निकालाने त्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे.शिवसनेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने जिजामाता रूग्णालय प्रभाग क्रमांक ४३ अ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या गौतम चाबुकस्वार यांनी बंधू सुनील चाबुकस्वार यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारीचा आग्रह धरला. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सुनील चाबुकस्वार यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढली असता, ही जागा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयला सोडली जात असे. या निवडणुकी वेळी मात्र ही जागा आरपीआयला सोडण्याबाबत लवकर निर्णय होत नव्हता. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पिंपरी विधानसभेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यात समन्वयाची चर्चा झाली. अधिवेशनावरून आल्यानंतर आमदार जगताप यांनी ही जागा आरपीआयला सोडली जाईल, असे जाहीर केले. निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार भाजपाकडे असूनही चाबुकवार आणि जगताप यांंच्यातील समझोत्यामुळे भाजपाने उमेदवार दिला नाही. त्यानंतर चाबुकस्वार यांच्या बंधूसाठी ‘फिक्सिंग’ झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली. शहराध्यक्ष योगेश बहल, आझम पानसरे, पक्षनेत्या मंगला कदम तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची या निवडणुकीत एकजूट दिसून आली. पूर्वीचा रामआधार धारिया यांचा प्रभागरचनेमुळे हातातून गेलेला प्रभाग पुन्हा ताब्यात मिळविण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.
भाजपा-सेनेची ‘फिक्सिंग’ राष्ट्रवादीच्या पथ्यावर
By admin | Updated: January 20, 2015 00:46 IST