पुणे - राजकीय दबावातून काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली, या काँग्रेसच्या आरोपाला भारतीय जनता पार्टीने सत्तेचा फायदा घेण्याची सवय तुमचीच आहे, असे सणसणीत उत्तर दिले आहे. निवडणुकांआधीच या दोन प्रमुख पक्षांच्या शहर शाखेत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपा नगरसेविकेचा पती व अविनाश बागवे यांच्यात वाद झाले. त्यावरून पोलीस फिर्याद करण्यात आली. त्यात भाजपा पदाधिकाऱ्याला काहीही न करता पोलिसांनी अविनाश बागवे यांना मात्र एक संपूर्ण रात्र पोलीस कोठडीत ठेवले. राजकीय दबावातूनच हे करण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्याला भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी बुधवारी उत्तर दिले.सत्तेचा फायदा घेण्याची सवय काँग्रेसचीच आहे, अशी टीका करून गोगावले म्हणाले, ‘‘बागवे व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाले आहेत असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यावरून त्यांनी कायद्यानुसार योग्य अशीच कारवाई केली आहे. पुत्रप्रेमापोटी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे काहीही आरोप करत आहेत. ते निराधार आहे. भाजपाचे मंत्री अशा गोष्टीत कधीही लक्ष घालत नाहीत. पोलिसांनी नि:पक्षपणे कारवाई केली आहे व प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता विनाकारण कसलेही तारे तोडूनयेत.’’एखाद्या गुन्ह्यात अशा प्रकारे राजकीय फायदा घेणे हेच मुळात गैर आहे. असे करून काँग्रेसच पोलीस व न्यायव्यवस्था यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. कायद्यानुसार योग्य काय ते होईल, त्यासाठी पोलिसांना मोकळीक द्यावी, विनाकारण भलतेसलते आरोप भाजपावर करून यात राजकारण घुसडू नये, असे गोगावले म्हणाले.
भाजपा-कॉँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू, बागवे अटक प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 02:49 IST