चाकण : वाहतुकीच्या कोंडीतून होणारे किरकोळ अपघात आता हाणामारीपर्यंत पोहचत असून असे प्रकार चाकण-तळेगाव रस्ता व पुणे-नासिक महामार्गावर सर्रास घडत आहेत. त्यातून स्थानिक चालकांची अरेरावी वाढली असून बाहेरच्या जिल्ह्यातील अथवा पर प्रांतातातील वाहन चालकांना मारहाण होत आहे. केवळ बाहेरचा माणूस व नको त्या कायदेशीर कटकटी म्हणून पोलीस ठाण्यापर्यंत कोणी तक्रार देत नाही. अनेकदा पोलिसांना मध्यस्थी करून दोन्ही वाहनचालकांना समज देऊन मिटवण्याची भूमिका घ्यावी लागते.आज ( दि. ३१ मार्च ) दुपारी साडे चारच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर मयूर हॉटेलजवळ हरियाणा पासिंगच्या एका कंटेनरने मावळ तालुक्यातील भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्याच्या मोटार गाडीला घासले, त्यात मोटारीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कारमधील कंटेनर चालकास खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि काही क्षणात त्याने कमरेचा पिस्तूल काढून दमदाटी करून शिवीगाळ केली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र हातात घोडा पाहिल्याने मध्ये पडण्यास कुणी तयार नव्हते. यामुळे तळेगाव रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहतूक थांबली होती. बघ्यांपैकी उपस्थितांमधून एकाने तळेगाव चौकातील वाहतूक पोलिसांनो फोन करून बोलावले. काही वेळात पोलीस त्याठिकाणी हजर झाले, आणि हे प्रकरण पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांना समज देऊन मिटविले. आणि दोन्ही वाहन चालकांनी इन्शुरन्स कंपन्यांकडून भरपाई करून घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय भाजपच्या त्या कार्यकर्त्याकडे असलेला पिस्तोल ऑनलाईन खरेदी केला असून तो नकली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
कंटेनरने कारला घासले, भाजपाच्या ‘त्या’ कार्यकर्त्याने काढली नकली पिस्तुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 19:33 IST