पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयात दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग, चाैकशी सुरू

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: April 13, 2024 05:04 PM2024-04-13T17:04:18+5:302024-04-13T17:06:37+5:30

याप्रकरणी संबंधित महिला निवासी डाॅक्टरांनी ससून रुग्णालयाकडे तक्रार केली असता रॅगिंग प्रतिबंधात्मक चाैकशी समितीने या दाेन्ही प्रकरणांची चाैकशी केली आहे

BJ Medical College Ragging on two female resident doctors, Chaik started | पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयात दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग, चाैकशी सुरू

पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयात दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग, चाैकशी सुरू

पुणे : ससून रुग्णालयाच्या बीजे वैदयकीय महाविदयालयात क्ष-किरणशास्त्र (रेडिओलाॅजी) आणि भुलशास्त्र (ॲनेस्थेसिया) या विभागांत पदव्यूत्तर पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यातील एक प्रकार हा मार्चमध्ये तर दुसरा रॅगिंगचा प्रकार हा गेल्या आठवडयात घडला आहे. प्रशासनाकडून याची चाैकशी करण्यात येत आहे.

याप्रकरणी संबंधित महिला निवासी डाॅक्टरांनी ससून रुग्णालयाकडे तक्रार केली असता रॅगिंग प्रतिबंधात्मक चाैकशी समितीने या दाेन्ही प्रकरणांची चाैकशी केली आहे. त्यापैकी एका चाैकशीचा अहवाल वैदयकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठवला आहे. अजून या प्रकरणात काही कारवाई झालेली नाही. ‘बीजे’ हे राज्यातील तसेच देशातील नामांकित वैदयकीय महाविदयालय आहे. येथे एमबीबीएस या वैदयकीय पदवीसह मेडिसिन, सर्जरी, स्त्रीराेग, भुलशास्त्र आदी प्रकारचे पदव्यूत्तर पदवी शिक्षणही देण्यात येते. त्यामुळे एकाच वेळी हजाराेंच्या संख्येने विदयार्थी येथे शिक्षण घेत असतात.

दरम्यान, गेल्या महिन्यात क्ष-किरणशास्त्र विभागातील निवासी महिला डाॅक्टरसाेबत रॅगिंग झाल्याची ही घटना गेल्या महिन्यात घडली. रॅगिंग प्रतिबंधात्मक चाैकशी समितीने याची चाैकशी केली असून त्याचा अहवाल वैदयकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांनी दिली. तसेच दुसऱ्या तक्रारीबाबत चाैकशी सूरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुस-या प्रकरणात भुलशास्त्र विभागातील कनिष्ठ निवासी महिला डॉक्टरला वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी रॅगिंग केल्याचे आणि तिला धमकावले असल्याचे म्हटले आहे. तिने कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर पदव्युत्तर पदवी (पीजी) तक्रार निवारण समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पदव्युत्तर पदवी विभागाचे अधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान हे या प्रकरणांची चाैकशी करत असून त्यांनी सांगितले की चाैकशी समितीकडून कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डाॅक्टरांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. तसेच संबंधित प्राध्यापकांकडेही चाैकशी करण्यात येत असून याचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

दरम्यान गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अस्थिराेग विभागातील निवासी डाॅक्टरांनी हाॅस्टेलमध्ये जाेरात थर्टी फस्ट साजरा केला हाेता. त्यातील बाटल्यांचे फाेटाेही बाहेर आले हाेते. तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत सक्त ताकीद दिली हाेती.

Web Title: BJ Medical College Ragging on two female resident doctors, Chaik started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.