आसखेड (पुणे) : भामाआसखेड धरणात ६९.९७ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी ७५.४३ टक्के इतका होता, अशी अधिकृत माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. यंदा एकूण १२९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेडसह शिरुर, दौड तालुक्याला वरदान ठरणारे भामाआसखेड ८ टीएमसीचे धरण आहे. सध्या एकूण साठा ५.८४ (१६५.४४३ दलघमी) टीएमसी असून ५.३७ टीएमसी (१५१.९२१ दलघमी) उपयुक्त साठा आहे.
यंदा गतवर्षीपेक्षा सुमारे सहा टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील महिन्याचे पाण्याचे नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. तीन तालुक्यांतील शेतकरी आणि सर्वसामान्य या पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाची तीव्रताही वाढत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. आत्तापर्यंत रब्बी हंगामातील १४ डिसेंबर ते २३ डिसेंबर २२ आणि १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २३ दरम्यान आवर्तने सोडली आहेत आणि अजूनही दोन आवर्तने (एप्रिल व जूनमध्ये) गरजेनुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती घारे यांनी दिली.
शेतीसह पिण्याचे पाणी प्रश्न सुटणारे भामाआसखेड हे महत्त्वाचे धरण आहे. खेड, शिरूर, दौंड या तीन तालुक्यांसह आत्ता पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासही भामाआसखेड वरदान ठरणार आहे.