लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, पिंपरीच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा समप्रमाणात पुरवठा न झाल्याने ग्रामीण भागात लसीकरण कमी झाले आहे. ग्रामीण भागात ३१ टक्के नागरिकांनी पहिला डोस, तर केवळ ६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. रोज ५० हजारांहून अधिक नागरिकांची क्षमता जिल्ह्यातील केंद्राची आहे. यामुळे येत्या काळात जिल्ह्याला समप्रमाणात लसी उपलब्ध कराव्या, अशी मागणी राज्यशासनाकडे करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
जिल्ह्यातील लसीकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी पानसरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. सचिन येडके उपस्थित होते. पानसरे म्हणाल्या, २७ लाख ५८ हजार ७३९ नागरिकांच्या लसीकरणाचे आमचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ लाख ६९ जणांनी पहिला डोस घेतला. तर १८ लाख ९८ हजार ६७० नागरिकांचा पहिला डोस घेण्याचे अद्याप बाकी आहे. केवळ ३१ टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. तर १ लाख ६९ हजार ७०३ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचे प्रमाण हे केवळ ६ टक्केच आहे. एकूण १० लाख २९ हजार ७७२ जणांचे लसीकरण झाले असून, २५ लाख ८९ हजार ३६ जणांचे लसीकरण अद्याप बाकी आहे.
जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यात हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात ४०८ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत मिळणारा लसींचा पुरवठा हा कमी आहे. वास्तविक पाहता हा पुरवठा समप्रमाणात होणे अपेक्षित असताना तो झाला नाही. १७ ते १८ टक्के लसींचा पुरवठा कमी झाल्याने लसीकरणात ग्रामीण भाग मागे राहिल्याचे पानसरे म्हणाल्या.
जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३ लाख ५ हजार ३६५ जणांनी म्हणजे ८१ टक्के ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र, केवळ ३८ हजार ५२६ जणांनी म्हणजे केवळ ११ टक्के जणांनीच दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात दुसरा डोस देण्याचे प्राधान्य राहील, असे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी सांगितले.
चौकट
तर ९० दिवसांत होईल लसीकरण पूर्ण
जिल्ह्यात ३६७ शासकीय, तर ४१ खासगी अशा एकूण ४०८ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक जणांचे लसीकरण करण्याची क्षमता या केंद्रांची आहे. यामुळे जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केल्यास केवळ ग्रामीण भागासाठी ५० हजार लसींचे डोस उपलब्ध झाले तर ग्रामीण भागातील लसीकरण हे ९० दिवसांत पूर्ण होऊ शकते.
चौकट
तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. शहरी भागाच्या तुलनेत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. तिसऱ्या लाटेचेही भाकीत करण्यात आले असून या लाटेला जर थोपवायचे असेल तर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी लसींचा पुरवठा वाढणे गरजेचे असल्याचे पानसरे म्हणाल्या.
कोट
राज्य शासनाला पत्र देणार
जिल्ह्याला पुणे, पिंपरीच्या तुलनेत लसींचा कमी पुरवठा झाला. यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवता आला नाही. यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या तुलनेत येत्या काळात लसींचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच राज्य शासनाला निवेदन दिले जाणार आहे. तसेच त्यासाठी पाठपुरवा करण्यात येणार आहे.
- निर्मला पानसरे, जिल्हा परिषद अध्यक्ष
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पुणे महापालिका
एकूण उद्दिष्ट : १६ लाख ३० हजार २६४
पहिला डोस लाभार्थी : ६ लाख ९४ हजार २८५ (एकूण ४३ टक्के)
दुसरा डोस लाभार्थी : २ लाख २८ हजार ७२३ (एकूण १४ टक्के)
पिंपरी महापालिका
एकूण उद्दिष्ट : ६ लाख २९ हजार ६९५
पहिला डोस लाभार्थी : ३ लाख ५२ हजार१४२ (एकूण ५६ टक्के)
दुसरा डोस लाभार्थी : १ लाख १६ हजार ३८२ ( एकूण १६ टक्के)
ग्रामीण भाग (नगरपालिका/कटक मंडळे मिळून)
एकूण उद्दिष्ट : २७ लाख ५८ हजार ७९३
पहिला डोस लाभार्थी : ८ लाख ६० हजार ६९ (एकूण ३१ टक्के)
दुसरा डोस लाभार्थी : १ लाख ६९ हजार ७०३ (एकूण ६ टक्के)
१० लाख २९ हजार ७७२ जणांना मिळाली लस