बारामती : शहरातील कचरा ढाकाळे (ता. बारामती) येथील जागेत टाकण्याऐवजी पर्यायी जागेचा विचार करावा, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यामुळे बारामती शहराचा घनकचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्या पाठोपाठ बारामतीच्या कचरा डेपोचा प्रश्न प्रलंबित आहे. सध्या बारामतीचा कचरा डेपो जळोची या उपनगरात आहे. पूर्वी हा भाग ग्रामीण म्हणून ओळखला जात होता. तीन वर्षापूर्वी हा भाग नगरपालिकेच्या हद्दीत आला. २००३ मध्ये बारामती शहरातील रस्त्यांची बांधणी बीओटी तत्त्वावर करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला या कचरा डेपोची २२ एकर जागा कराराने देण्यात आली. या जागेवर कोट्यावधी रुपयांचे कर्ज देखील ठेकेदाराने काढले आहे. सध्या शहराच्या मध्यभागी हा कचरा डेपो आहे. तर शहराच्या आसपास १० ते १५ किलोमीटर परिसरातील गावांमध्ये कचरा डेपोला विरोध होत आहे. गाडीखेल, माळेगाव, पिंपळी या भागातील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर वेगळ्या मार्गाने ढाकाळे येथे जागा खरेदी करून कचरा डेपो (घनकचरा व्यवस्थापन) करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याची कुणकुण ढाकाळे ग्रामस्थांना लागल्यापासून सर्वच स्तरावर त्याला विरोध होऊ लागला आहे. कचरा डेपोसाठी समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये सर्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना घेण्यात आले आहे. कचरा डेपोला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून महसूलमंत्री, ग्रामविकास मंत्री आदींकडे तक्रार केली आहे. कचरा डेपो प्रश्नी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर देखील मोठ्या प्रमाणात दबाव येत असल्याचे चित्र आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना, वन्यप्राण्यांना या कचरा डेपोचा अडथळा होत असेल तर ढाकाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत घनकचरा डेपो करू नये, असे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)ग्रामसभेतच कचरा डेपोला विरोध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंके यांनी बारामती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ढाकाळे ग्रामस्थांचा विरोध असल्याने नागरी घनकचरा व्यवस्थापन हाताळणीसाठी नवीन प्रस्थापित जागेचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी सूचना केली आहे. तसेच, या गावातील जागेचा गट क्रमांक ८४, ८५ मध्ये घनकचऱ्यासाठी वापर करायचा असेल तर ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामपंचायत, तसेच गावच्या ग्रामसभेत या कचरा डेपोला विरोध करण्यात आला आहे.
बारामती शहराच्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST