बारामती : जिल्ह्यात गणेश उत्सव मिरवणुकीसाठी ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहे. यंदा पाणीटंचाईचे सावट विसर्जन मिरवणुकीवर आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती गणेश विसर्जनासाठी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील विसर्जन मिरवणुका वेळेत आणि शांततेत पार पडण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्यासह दोन्ही विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. जिल्ह्यात ३६ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गणेश मंडळांच्या प्रमुखांची बैठक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये घेण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि नियोजित वेळेत पार पाडण्याचे आवाहन केले आह. या शिवाय गुलालाऐवजी पाकळ्यांचा वापर मिरवणुकीत करावा, असे आवाहन केले आहे. ----------दौंड येथे गणेश विसर्जनाची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. साधारणत: रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शहर आणि परिसरातील घरगुती; तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होईल. दौंड नगर परिषदेच्या वतीने भीमा-नदीच्या किनाऱ्यावर विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. जेणेकरून रात्रीच्या वेळेला गणेश विसर्जन करताना गणेशभक्तांना उपद्रव निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर असलेले छोटे छोटे खड्डे बुजविण्यात आले आहे. तर नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. -----दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शहरातील जवळपास १५ गणेशोत्सव मंडळांनी जागेवरच गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी इंदापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. गणेश विसर्जनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेऊन पोलीस यंत्रणेस उपयुक्त सूचना देताना त्यांनी उपरोक्त संकेत दिला. इंदापुरला ४८ मंडळांनी गणेश स्थापना केली होती. त्यापैकी सहा गणेशोत्सव मंडळांनी या पूर्वीच विसर्जन केले आहे. उर्वरित ४२ मंडळांपैकी निम्म्या मंडळांनी जागेवरच गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा ताण कमी होणार आहे.------आंबेगाव तालुक्यातील मंचर व घोडेगाव या मुख्य गावांमध्ये विसर्जन मिरवणूक वेळेत व शांततेत होण्याकडे प्रशासनाचा भर असून, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मंचर शहराचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच डीजे वापरावर बंदी घालण्यात आली असून, मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरू नयेत यासाठी पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. मंचरमध्ये शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल व कळंब येथे घोडनदी पात्रात विसर्जन होईल. विसर्जन मिरवणुकीनिमित्त बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. घोडेगाव येथे अहित्यादेवी चौकातून मिरवणुकीला सुरुवात होईल व घोडनदीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. ----यंदा पहिल्यांदाच नीरा डावा कालव्यात धरणाचे पाणी न सोडल्यामुळे बारामती नगरपालिकेने कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये गणेशविसर्जन करावे लागणार आहे. विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल, राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. शहारातील चौकामध्ये पोलीस अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत. विसर्जन मिरवणूक अधिक काळ रेंगाळू नये, यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक मंडळाचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!
By admin | Updated: September 27, 2015 01:30 IST