नीलेश राऊत -
पुणे : हृदयविकारातील सर्वांत किचकट मानली जाणारी तथा ज्या शस्त्रक्रियेत ९० टक्के जीविताची खात्रीही नसते, अशी ‘बेनटाल शस्त्रक्रिया’ नुकतीच पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील हृदयरोग विभागात यशस्वीरीत्या करण्यात आली. खाजगी रुग्णालयांत या शस्त्रक्रियेला पंधरा ते सतरा लाख रुपये खर्च येतो. मात्र येथे ही शस्त्रक्रिया माफक दरात झाल्याने, पालिकेची रुग्णालयेही खाजगी व नामांकित रुग्णालयाच्या तोडीस तोड असल्याचे आधोरेखित झाले आहे.कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ‘पुणे महापालिका’ व ‘टोटल हार्ट सोल्युशन वेलनेस’ (टी़एच़एस़) यांच्या संयुक्त विद्यमाने, हृदयरोग विभाग गेल्या सव्वादोन वर्षांपासून चालविला जात आहे़ एक वर्षापूर्वी या ठिकाणी हृदयरोगावरील शस्त्रक्रिया सुरू झाल्या. सी़जी़एच़एस़ (सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम) दरात याठिकाणी उपचार केले जात असून, या हृदयरोग विभागाचा लाभ आजपर्यंत पुण्यातील तसेच पुण्याबाहेरील ३५ हजार रुग्णांनी घेतला आहे. पालिकेची रुग्णालये म्हटल्यावर नाके मुरडणाऱ्या अनेकांसाठी हे रुग्णालय तथा हृदयरोग विभाग नवसंजीवनी देणारे तथा अन्य पालिकेच्या दवाखान्यांसाठी पथदर्शक ठरला आहे. या विभागात आजपर्यंत ५० ओपन हार्ट सर्जरी, १ हजार ७३६ अॅन्जोग्राफी, १ हजार १६२ अॅन्जोप्लास्टी सर्जरी झाल्या आहेत. सर्व उपचार सी़जीएच.एस. दरातच आहेत.
............महापालिकेतर्फे रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत असून, या रुग्णालयात सर्वसामान्यांना योग्य व माफक दरात उपचार मिळावेत यासाठी पालिका प्रयत्नशील आहे - सौरभ राव, आयुक्त, पुणे महापालिका.............