लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : किरकोळ कारणातून लोखंडी शिकंजा व रॉडने मारहाण करत कामगाराच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पिता-पुत्रांसह तिघांना अटक केली.
नारायण ठाकरिया चव्हाण (वय ५५), गणेश नारायण चव्हाण (वय ३१), व्यंकटेश नारायण चव्हाण (वय २३, सर्व रा.कलपाने वस्ती आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी, वसंत गायकवाड (वय ४१, रा. गोकूळनगर कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना वाघजाईनगर कात्रज येथील एका बांधकाम साईटवर २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
वाघजाईनगर कात्रज येथील एका बांधकाम साईटवर फिर्यादी व आरोपी या दोघा ठेकेदारांची कामे सुरू आहेत. दरम्यान गायकवाड यांच्याकडे काम करणारे कामगार संजय व बबलू शर्मा या दोघांनी शॉटसर्किट होत असल्यामुळे विद्युत वायर तोडले. त्यातूनच आरोपी सोबत त्यांची बाचाबाची झाली. त्या वेळी चव्हाण पितापुत्रांसोबत त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून लोखंडी शिकंजा व रॉडने संजय शर्मा याच्या डोक्यात मारहाण केली. तसेच गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर शर्मा यांचा साथीदार बबलू याला लोखंडी रॉडने हातावर व तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले.