वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्हा परिषद गटातील मोठ्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता येणार यावर पारा पारावर आणि चौका चौकात चर्चा रंगू लागल्याने ऐन थंडीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच गरम झाले आहे.
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब आणि आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या वालचंदनगर ग्रामपंचायतींवर कोणाची वर्णी लागणार हा औत्सुक्याचा विषय झाला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मात्र शासकीय जागेत अतिक्रमण प्रकरणामुळे कळंब गावाची सत्ता अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. तर वालचंदनगर ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती. दोन्ही ग्रामपंचायतीचे मतदान इंदापूर तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याइतके असल्याने गावपातळीवर गट तट विसरून नव्या जोमाने कार्यकर्ते मंडळी कामाला लागली आहे. दोन्ही ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत कमालीचा घोळ होता. मोठया प्रमाणावर हरकती घेतल्या होत्या आणि दुरुस्ती मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कागदपत्रे काढण्यासाठी गुडग्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांची धावपळ होताना दिसत आहे.
इंदापूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या ग्रामपंचायती म्हणून उल्लेख असलेल्या ग्रामपंचायतीत कळंब आणि वालचंदनगर असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीवर तालुक्याचे लक्ष लागले आहे. कळंब ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागात १७ उमेदवार असून वालचंदनगर ग्रामपंचायतीत देखील ६ प्रभागातून १७ उमेदवारांची वर्णी लागणार आहे. इंदापूर तालुक्याच्या राजकिय पटलांवरील महत्वाच्या ग्रामपंचायतीच्या चाव्या कोणाच्या ताब्यात जाणार हे निवडणुकीनंतर कळणार असले तरी अनेक राजकीय अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आखाडे बांधले असले तरी मतदार राजा राजकारण्यांचे भवितव्य ठरवणार आहे हेच खरे.