---
कलाकार, जादूगार ते तहसीलदार
नृत्यदिग्दर्शक... जादूगार अन् काही वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देवून तहसीलदार असा वेगळा आणि काहीसा खडतर प्रवास करून यश संपादन केले. त्यामुळे उदर्निवाहाचा प्रश्न सुटला, शासकीय सेवेत रुजू होऊन आता समाजासाठी काम करता येईल, असे अविनाश शेंबेटवाड या तरूणाच्या वाटले. परंतु, तहसीलदार म्हणून निवड होऊन तब्बल दहा महिन्यांचा कालावधी गेला तरीही तो नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळेच स्पर्धा परीक्षा म्हणजे हमखास नोकरी, काही वर्ष प्रयत्न केले तर यश मिळेल, दुसऱ्याला सरकारी नोकरी मिळते ; मग मला का नाही? केवळ असा वरवरचा विचार करून चालणार नाही? तर प्रत्येकाने स्वत:चा प्लॅन ‘बी’ तयार ठेवला पाहिजे, असे अविनाश पोट तिडकीने सांगतो.
नृत्य, अभिनयाची आवड असल्याने परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रात करिअर करावे, या उद्देशाने अविनाशने पुण्यात येऊन एफटीआयआय प्रवेश घेण्याचे ठरवले. केली एफटीआयआयच्या प्रवेश पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू केला. परंतु, कॉलेज गॅदरिंगचे डान्स बसवणे, नाटकाचा सेट उभा करणे या आवडीच्या कामातून उदर्निवाहाचा प्रश्न सुटणार नव्हता. त्यामुळे मित्रांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरूवात केली. अभ्यासात सातत्य ठेवले तर आपण यश मिळवू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर राज्यसेवा परीक्षेतून तहसीलदार म्हणून त्याची निवड झाली. परंतु ,मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे अद्याप शासनाकडून नियुक्ती मिळाली नाही.त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना दरवर्षी अशा अनेक अडचींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवावर तो शॉर्टफिल्म तयार करत आहे.
तहसीलदार म्हणून निवड होऊनही नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे काही वर्षांपूवी शिकलेली जादूची कला सध्या क्लोजप मॅजिनिशियन म्हणून सादर करून उदर्निवाहाचा प्रश्न सोडवतो. जादू नेमकी कशी केली जाते. याबाबत आंधश्रध्दा निर्मूलन समितीबरोबर काम करून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धा परीक्षेत अपयश येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाकडे ‘प्लॅन बी’ तयारच असला पाहिजे. अन्यथा मिळालेल्या अपयशातून सावरणे कठीण जाते. त्यामुळे अभ्यास करताना शिक्षण सुरू ठेवून नेट-सेट सारख्या परीक्षा किंवा एखादा रोजगार, व्यावसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात केले पाहिजे.
गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून होणाऱ्या निवड प्रक्रियेबाबत अविनाश सांगतो, एमपीएससीने परीक्षा घेण्याचे वेळापत्रक कधीच पाळले नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा म्हणजे मृगजळाच्या मागे धावणे, असाच काहीसा प्रकार आहे. तसेच आपल्या नातेवाईकातील किंवा गावातील मुला-मुलीने स्पर्धा परीक्षेतून एखादे पद मिळवले. त्यामुळे त्याच्याभोवती निर्माण झालेले प्रसिध्दीचे वलय पाहून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, स्पर्धा परीक्षा म्हणजे टाईमपास नाही. घरच्यांच्या दबावा आहे म्हणून निवडला स्पर्धा परीक्षांचा मार्ग. सर्वच या परीक्षांचा अभ्यास करतात आपणही करावा,हा वरवरचा विचार करून या क्षेत्राकडे येऊ नका तर आपल्या अंतर्मनाला काय वाटते. परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपण स्वत:ला सिध्द करू शकतो. अभ्यासात झोकून देण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची आपली तयारी आहे का? याचा विचार प्रत्येकाने करावा. तसेच या परीक्षांसाठी आयुष्यातील किती वर्ष द्यायचे याची सीम प्रत्येकाने निश्चित करावी. स्वत:ची आणि स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाची फरपट करून घेऊ नये. परंतु, यशस्वी होण्याची जीद्द ,त्याग, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोटीही तुम्हाला रोखू शकणार नाही. हे ही तितकेच खरे,असेही अविनाश सांगतो.
शब्दांकन : राहुल शिंदे (वरिष्ठ बातमीदार, लोकमत, पुणे)