शिरूर : तालुक्यातील चासकमान व डिंभे प्रकल्पासाठी शासनाने १५-१६ च्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चासकमान डाव्या कालव्याला असणारी मोठी गळती रोखण्यासाठी एप्रिलमध्ये १० कोटी रुपये, तसेच डिंभे उजव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत नेण्यासाठी २० कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.चासकमान कालव्याचे अस्तरीकरण व डिंभे उजव्या कालव्याचे भूसंपादनाअभावी रखडलेल्या कामासंदर्भात आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या मागणीवरून विधानभवन येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाचर्णे यांनी उपरोक्त प्रकल्पासंदर्भातील समस्यांसंदर्भात महाजन यांना अवगत केले.यावर जलसंपदामंत्री महाजन यांनी चासकमान प्रकल्पासाठी ९.२३ कोटी, तर डिंभे प्रकल्पासाठी १४.१७ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचे बैठकीत स्पष्ट केले. यावर पाचर्णे यांनी हा निधी कमी पडणार आहे. भूसंपादनासाठीच १४ कोटी रुपये लागणार असून, अस्तरीकरणासाठीही मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे महाजन यांच्या निदर्शनास आणले. यावर चासकमानच्या अस्तरीकरणासाठी (डावा कालवा) जादा निधी लागणार असल्याने सध्या मोठ्या प्रमाणात होणारी गळती रोखण्यासाठी एप्रिलमध्ये तातडीने १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच अस्तरीकरणासाठी सिमेंट, खडी वापरण्याऐवजी रबर अथवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याचा अभ्यास ‘मेरी’ या संस्थेमार्फत केला जाईल, असेही जाहीर केले. डिंभे कालव्याचे पाणी शेवटपर्यंत नेण्यासाठी आवश्यक असणारा २० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे सूतोवाच करतानाच भूसंपादन व नवीन कामासाठी सुधारित प्रस्ताव घेऊन त्यास मान्यता देण्याचेही महाजन यांनी बैठकीत जाहीर केले. कुकडी, घोड व मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्या बदलणे व प्रलंबित देयके, तसेच इतर कामांसाठी तरतूद करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना केल्या आहेत. (वार्ताहर)
चासकमान, डिंभेचे पाणी पोचणार शेतात
By admin | Updated: March 25, 2015 23:27 IST