इंदापूर : तालुक्यातील वरकुटे खुर्द गावात सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यांनी ५४ हजार ७५० रुपयांची लूट केली. त्यांच्यापैकी एक जण दागिन्याच्या हव्यासाने परत आल्याने ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.शांताराम जगू भोसले (रा. तांदूळवाडी, ता. बारामती) असे त्या दरोडेखोराचे नाव आहे. कडेकोट बंदोबस्तात उपजिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहेत. दिलीप तुकाराम ढवरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.अधिक माहिती अशी, निमगाव-केतकी दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वरकुटे खुर्द गावाच्या हद्दीतील ढवरेवस्ती आहे. येथे ढवरे यांच्या घरावर आज (दि. २३ सप्टेंबर) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा घातला. सोन्या चांदीचे दागिने मिळून ५४ हजार ७५० रुपयांची लूट केली. परतत असताना शांताराम भोसले याची नजर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे गेली. ते चोरण्यासाठी तो परतला. दरम्यान, जाग्या झालेल्या ग्रामस्थांच्या तावडीत तो सापडला. (वार्ताहर)
वरकुटे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा
By admin | Updated: September 24, 2014 06:00 IST