पुणे : गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत असताना २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून १६ नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना खासगी विना अनुदानित तत्त्वावर प्रवेश करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) आणि राज्य शासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पीक वाढत चालल्यामुळेच सध्या अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. गेल्या वर्षी सुमारे ६० हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा हा आकडा ६५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे, असे असूनही राज्यात नवीन १६ अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ५ फार्मसी, ५ आर्किटेक्चर, ३ व्यवस्थापन आणि एका एमसीए कॉलेजला मान्यता व काहींना तुकडीवाढ देण्याचा अध्यादेश राज्य शासनातर्फे काढण्यात आला आहे. त्यात पुण्यात लोकनेते दादापाटील फराटे महाविद्यालयास फार्मसी अभ्यासक्रमास १२० जागांवर आणि इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट संस्थेस व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सध्या २४० प्रवेश क्षमता असूनही आणखी ६० जागांवर प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे.राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांना मान्यता देऊ नये किंवा मान्यता देण्यापूर्वी शासनाचे मत विचारात घ्यावे, असा पत्रव्यवहार आघाडी सरकारने एआयसीटीकडे केला होता. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. सध्याच्या युती सरकारनेही चालू शैक्षणिक वर्षात एकाही नवीन महाविद्यालयास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे म्हणाले, केंद्र शासन, राज्य शासन आणि एआयसीटीई यांच्यातील समन्वयाच्या आभावामुळेच राज्यात महाविद्यालयांची संख्या वाढत चालेली आहे. त्यामुळे एआयसीटीईने नवीन संस्थांना परवानगी देण्यापूर्वी शासनाने केलेला प्रारूप आराखडा विचारात घेवूनच परवानगी द्यायला हवी.बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. परंतु, दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयातून अकरावी- बारावीचे विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली, तर आपोआपच अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.’’- डॉ. गजानन खराटे अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता केवळ कायद्याच्या चौकटीत राहून नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता देणे उचित होणार नाही. तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमास किती विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यातील किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात आणि त्यांना रोजगार प्राप्त होतो. ही आकडेवारी विचारात घ्यावी लागणार आहे. हजारो विद्यार्थी पदव्या घेवून बाहेर पडले. परंतु, त्यांना रोजगार मिळाला नाही; तर त्यांना वैफल्य येते. त्यामुळे नवीन संस्थांना परवानगी देताना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच युवाशक्ती व राष्ट्रहित या दृष्टीने विचार करावा लागणार आहे.- डॉ. अरुण अडसूळ, शिक्षणतज्ज्ञ
आणखी १६ अभियांत्रिकी महाविद्यालये!
By admin | Updated: May 24, 2015 00:25 IST