पुणे : राज्यातील १ लाखावर अंगणवाड्यांचा बंद अखेर २६व्या दिवशी मागे घेण्यात आला. शासनाने अंगणवाडीतार्इंची केलेली मानधनवाढ पुरेशी नसली, तरी व्यापक विचार करून राज्य कृती समितीने बंद मागे घेतला आहे. अंगणवाडीच्या कारभारात सेविका मदतनीसांचे प्रचंड शोषण होत आहे. ते थांबविण्यासाठी बंद मागे घेतला असला तरी न्याय्य मागण्यांविषयी आणि आत्मसन्मानासाठी संघर्ष मात्र सुरूच राहील, असा निर्धार अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांनी आज येथे व्यक्त केला. बंद मागे घेण्या विषयी काल मुखमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठक व निर्णयाची माहिती देण्यासाठी आज कर्मचारी सभेची सभा झाली त्यात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, राज्यव्यापी बंदला २५ दिवस उलटूनही मुख्यमंत्री चर्चा करायला तयार नव्हते. २ लाख १० हजार अंगणवाडी ताई संपावर होत्या. उलट संप चिरडण्याचे प्रयत्न सुरु होते. राज्यातील ५० लाख बालके पूरक आहार व ३५ लाख बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित होती. त्यातच बंद काळात बालमृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसूत होत होत्या. अशा वेळी मानव कल्याण क्षेत्रात काम करणार्यांनी किती ताणायचे याला काही नैतिक सीमा असते. ती ओलांडू नये म्हणून संपूर्ण राज्यशासनाचा प्रस्ताव पूर्णत: मान्य नसतानाही बंद स्थगित करण्यात आला आहे. बंद थांबला असला तरी अंगणवाड्यांचा कारभार सुधारण्यासाठी व अंगणवाडीतार्इंना आत्मसन्मानाने काम करता यावे यासाठी सतत संघर्ष चालू राहील. मानधन वेळेवर मिळावे, कामाचे अहवाल देण्याचे साहित्य प्रशासनाने वेळेवर पुरवावे, अंगणवाडीचे भाडे वेळेवर मिळावे, मुख्यसेविका बालविकास अधिकार्यांनी सेविका मदतनिसांना सन्मानाची वागणूक द्यावी, यावर या पुढच्या काळात भर राहील.अण्णा भाऊ साठे संस्था, नेहरू स्टेडियम येथे झालेल्या या सभेस शेकडो अंगणवाडी ताई उपस्थित होत्या.
अंगणवाड्यांचा बंद मागे, आत्मसन्मानाची लढाई मात्र सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 17:53 IST
शासनाने अंगणवाडीतार्इंची केलेली मानधनवाढ पुरेशी नसली, तरी व्यापक विचार करून राज्य कृती समितीने बंद मागे घेतला आहे.
अंगणवाड्यांचा बंद मागे, आत्मसन्मानाची लढाई मात्र सुरूच राहणार
ठळक मुद्देप्रस्ताव पूर्णत: मान्य नसतानाही बंद स्थगित करण्यात आला आहे.अंगणवाड्यांचा कारभार सुधारण्यासाठी व अंगणवाडीतार्इंना आत्मसन्मानाने काम करता यावे यासाठी सतत संघर्ष चालू राहील.