पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतून शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत शेळ्याही जप्त केल्या. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून होईपर्यंत या शेळ्या सांभाळण्याची वेळ पोलिसांवर आली.पोलीस उपनिरीक्षक पी. आर. कठोरे यांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि. २५) रात्री अकरा शेळ्या चोरीला गेल्याबाबतची तक्रार मामा काळे यांनी दिली. याबाबत चार चोरट्यांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार तपास सुरू असतानाच कासारवाडी येथील लोहमार्गालगतच्या झाडीत एक जण शेळ्या घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत एकाला ताब्यात घेतले असता या शेळ्या चोरल्या असल्याची कबुली त्याने दिली.त्या वेळी चोरीला गेलेल्या अकरा शेळ्यांसह एकूण ३२ शेळ्या चोरांकडून जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या शेळ्या हिंजवडी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. दरम्यान, शेळ्या ज्यांच्या आहेत त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या सोपविण्यात येत आहेत. परंतु प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेळ्या सांभाळण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, अशी ब्रिदवाक्य असणाºया पोलिसांवर चक्क शेळ्या राखण्याची वेळ आली. पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून शेळ्या चोरट्यांना अटक केली. परंतु, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पोलिसांना शेळ्या परत करता येत नाही. त्यामुळे बंदोबस्तासाठी असणारे पोलीस चक्क शेळ्या राखताना दिसत आहेत. त्यामुळे परिसरात शेळ्या राखणाºया पोलिसांची चर्चा सुरू आहे. याबाबत सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठविले जात आहेत. पोलीस कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर शेळ्या परत देणार आहेत. तोपर्यंत शेळ्या राखण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
पोलिसांनी ३२ शेळ्या जप्त केल्या आहेत. या शेळ्या शहरातील अनेक भागांतील शेतकºयांच्या आहेत. त्यांचा शोध घेऊन शेळ्या परत करण्यामध्ये पोलिसांचा वेळ जात आहे. पोलिसांकडे ११ शेळ्या चोरीला गेल्याबाबतची तक्रार दाखल झाली होती. पण पोलिसांच्या हाती ३२ शेळ्या लागल्या आहेत.