राजगुरुनगर : खेड तालुक्यात आज सर्वदूर पावसाला सुरुवात झाली असून, खरीप पेरण्यांसाठी आणि भाताच्या रोपांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. आज दिवसभर पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. पावसाअभावी पेरण्या रखडल्या होत्या, त्या आता सुरू होतील. तालुक्यात ५७००० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये भुईमूग ७५०० हेक्टरवर घेतला जातो. बाजरीचे क्षेत्र उन्हाळी बाजरीमुळे घटले आहे. अलीकडे २५०० हेक्टरवर बाजरी घेतली जाते. गेल्यावर्षी दुष्काळामुळे तीही नगण्य पेरली गेली होती. काही शेतकरी सोयाबीन व मका लागवडीकडे वळलेले आहेत. पूर्व भागात बटाटा पिकासाठी आवश्यक असलेला पाऊस अजूनही पडला नसल्याने बहुतांश बटाटा लागवडी प्रलंबित आहेत. पण हा पाऊस काही दिवस चालू राहिला, तर बटाटा लागवडी होतील. तालुक्याच्या पश्चिम भागात भाताचे क्षेत्र ८१०० हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांसाठी धूळवाफेवर बी टाकले आहे. त्याला या पावसाचा फायदा होणार आहे. आज सकाळपासून तालुक्याच्या सर्व भागांत मोसमी पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत होता.
खेड तालुक्यात सर्वदूर पाऊस
By admin | Updated: June 22, 2015 04:26 IST