लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : भारतीय संस्कृतीत ग्रंथांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आज डिजिटल तंत्रज्ञान आले असले, तरी देखील ग्रंथांचे महत्त्व संपणार नाही. 'एआय' तंत्रज्ञान हे केवळ संकलन करू शकेल, पण सृजन करू शकणार नाही. म्हणून ग्रंथ कायम राहतील,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयातील मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तक महोत्सव महाराष्ट्रभर राबविण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली. महोत्सव २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये सुमारे ७०० स्टॉल्स आहेत. फडणवीस म्हणाले की, आपले ग्रंथांशी असलेले नाते चिरकाल आहे. जगातील सर्वांत जुनी परंपरा भारताची आहे. समाजात सृजनशीलता आहे, तोपर्यंत पुस्तकं राहतील. वाचन संस्कृती कधीच संपू शकत नाही.
'मी पुन्हा येईन'चा गजर '
आमचे नेते प्रमोद महाजन सांगत की, एकाच ठिकाणी दोन वेळा पाहुणा म्हणून जाऊ नये. मात्र, हा पुस्तक महोत्सव आहे. मागील वर्षी आलो होतो, आता दुसऱ्या पर्वात आलो आणि पुढेही मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन,' असे तीन वेळा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्यातील मिश्किलीचा प्रत्यय श्रोत्यांना दिला.