यवत : एसटी बस, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहानांमधून अंधश्रद्धा जोपासणाऱ्या जाहिराती खुलेआम केल्या जात आहेत. ‘बाबा कासीमजी’ नावाने अशा जाहिराती केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आल्यानंतर करणी, जादूटोणा आदी अंधश्रद्धा गोष्टी हद्दपार होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सद्य:स्थितीत चक्क एसटी बसमधून अशा जाहिराती लावल्याचे सर्रास निदर्शनास येत आहे. जाहिरातींमध्ये शिर्डीच्या साईबाबांचा फोटो वापरून संबंधित बाबाने अजमेरवाले बाबा असल्याचे लिहून नागरिकांच्या धार्मिक श्रद्धेचा वापर केल्याचे दिसून येते.बसमधून प्रवास करीत असताना प्रवासी निवांत असतात. या वेळी त्यांच्या निदर्शनास येईल, अशा ठिकाणी खिडकीच्यावर व दरवाजावर जाहिराती चिकटविण्यात येतात. मध्यमवर्गीय प्रवासी तसेच गोरगरीब जनतेला त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या सोडविण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या जाहिरातींना भुलून अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अनेक कुटुंबे अडचणीत असताना त्यांच्या असह्यतेचा फायदा घेत स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचे अनेक प्रकार याअगोदरदेखील उघड झाले आहेत. अनेकांची मोठी आर्थिक फसवणूकदेखील यातून होते. त्यामुळे अगोदरच अडचणीत असणारी कुटुंबे आणखी अडचणीत येतात. यासाठी संबंधित बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची आवश्यकता आहे.बहुतांश एसटी बसमध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरविणाऱ्या जाहिरतींची स्टिकर बेकायदेशीरपणे लावली जातात; परंतु यावर कारवाई करणार तरी कसे आणि लावण्यात आलेली किती जाहिरात स्टिकर काढणार? असा प्रश्न एसटी बसच्या वाहकांना पडत आहे. रात्रीच्या वेळी बस मुक्कामी असलेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या जाहिराती गुपचूप चिकटवल्या जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जाहिरात करणारे गुपचूप अंधश्रद्धा पसरविणाऱ्या जाहिराती करीत असले तरी संबंधित जाहिरातींवर जादूटोणा करणाऱ्या बाबाच्या संपर्कासाठी मोबाइल क्रमांकदेखील देण्यात आला आहे. या मोबाइल क्रमांकावरून पोलीस अशा अंधश्रद्धा पसरविणारे भोंदूबाबांविरोधात कारवाई करू शकतात. अशा जाहिरातीमुळे अंधश्रद्धेला वाव मिळू शकतो.
एसटीत अंधश्रद्धा जोपासणाऱ्या जाहिराती
By admin | Updated: November 9, 2015 01:38 IST