८० ते १०० मिलिमीटरपर्यंत
पाऊस पडल्यावरच पेरण्या करा
कृषी विभागाचा सल्ला
(रविकिरण सासवडे)
बारामती : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने देखील जोपर्यंत सर्वदूर सलग दोन ते तीन दिवस ८० ते १०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरण्या करू नयेत असे आवाहन केले आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे कमी-अधिक प्रमाण राहिले आहे. मात्र, सर्वदूर पाऊस नसल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत. पुणे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८२९.१० मिलीमीटर आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये केवळ ८०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु गेल्या काही दिवसांत बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी मशागत करून शेत तयार ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात तांदळाची लागवड होत असते. शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर या पूर्वेकडील भागात प्रामुख्याने बाजरी, मका व इतर कडधान्यांचे पीक घेतले जाते. यंदा सोयाबिनला चांगला दर असल्याने जिल्ह्यात भोर, जुन्नर, खेड, बारामती आणि आंबेगाव तालुक्यात सोयाबिन पेरण्या वाढतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रानाला वाफसा नसल्याने तसेच पुरेशी ओल नसल्याने आता पेरण्या केल्या तर बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहू शकते. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कृषी विभागाने देखील सध्य परिस्थितीमध्ये पेरण्या न करता जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरण्या करू नका असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------------------
शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. सध्या तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबिन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील सोयाबिन, बाजरी, तूर, उडीद, मूग, मका ईत्यादी पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरून वाढते.
- बालाजी ताटे
उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती
-----------------------------
जिल्ह्यातील आतापर्यंतची पावसाची
आकडेवारी (मिलीमीटरमध्ये)
हवेली - ८४.४
मुळशी - ८५.४
भोर - ७९.९
वेल्हा - ८४.२
जुन्नर - ४९.४
खेड - ९२.९
आंबेगाव - ८४.५
शिरूर - ७६.८
बारामती - ७५.५
इंदापूर - ६२.१
दौंड - ९५.३
पुरंदर - ६३.९
---------------------------------
फोटो ओळी : उंडवडी-कडेपठार येथे पेरणीपूर्व बैलजोडीच्या सहाय्याने सुरू असलेली मशागत
१४०६२०२१-बारामती-०६
-------------------------------