पिंपरी : अनधिकृत मंगल कार्यालयांची पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अधिक वाहतूककोंडी होते. त्यामुळे मंगल कार्यालयांना पार्किंग व्यवस्था करण्याची सक्ती करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहे, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली. दापोडी येथील हॅरिस ब्रिज, भोसरी ते मोशी रस्ता, भोसरी ते आळंदी रस्ता आणि रहाटणी येथील जगताप डेअरी चौकासह विविध भागात वाहनचालकांना नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या सर्व ठिकाणची वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी कायमच्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी गुरुवारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लाक्षणिक उपोषण केले. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी गुरुवारी दुपारी पाचला भाजपाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शिष्टमंडळामध्ये आमदार जगताप, सारंग कामतेकर, एकनाथ पवार, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, शीतल शिंदे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी आदींचा समावेश होता. शहरातील अनधिकृत मंगल कार्यालयांमुळे अधिकाधिक वाहतूककोंडी होत असल्याचे शिष्टमंडळासोबतच्या चर्चेवेळी समोर आले. त्यामुळे आयुक्त वाघमारे यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांना अनधिकृत मंगल कार्यालयांसमोर करण्यात येणाऱ्या बेकायदा पार्किंगबाबत कडक कारवाईची सूचना केली. त्यानुसार शहरातील सर्वच मंगल कार्यालयांना स्वत:ची पार्किंग व्यवस्था करण्याबाबत वाहतूक पोलिसांमार्फत आठ दिवसांची नोटीस बजावण्यात येणार आहे, असे आश्वासन आयुक्त वाघमारे यांनी शिष्टमंडळाला दिले.
अनधिकृत मंगल कार्यालयांवर कारवाई
By admin | Updated: May 6, 2016 05:50 IST