भोर: शहरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे व बेकायदेशीर बांधकामांमुळे शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मोहीम नगरपालिकेने सुरु केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून ही मोहीम राबिवण्यात येत असून, आतापर्यंत ६३ अतिक्रमणांवर भोर नगरपलिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. रस्त्यावर आलेले फलकासह विविध प्रकारच्या १०० वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आहे.
शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे तसेच रस्त्यावर असलेले दुकानांचे फलक, भाजीपाला फळांचे गाडे, दुकानांचे शेड यामुळे शहरातील चौपाटी ते एसटी स्टँड रस्ता, सुभाष चौक ते राजवाडा चौक, पंचायत समिती ते भोर पोलीस स्टेशन रोडवर आणि शहरातील विविध गल्ल्यातील रस्त्यावर लावलेली वाहने नवनवीन होणाऱ्या टपऱ्या यामुळे शहरात वारंवार वाहतूककोंडी होत होती. याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या वेळी तहसीलदार अजित पाटील, मुख्यधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात, उपअभियंता वागज व अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या सूचनेनुसार २१ जानेवारीला पोलीस, नगरपलिका कर्मचारी यांनी भोर शहरात एकत्रित कारवाईला सुरुवात केली आणि शहरातील राजवाडा कमान मंगळवार पेठ ते चौपाटी दरम्यान रस्त्यावर आलेले फलक, भाजीपाला, फळेगाडे, विविध प्रकारचे साहित्य असे मागील सहा दिवसांत ६३ अतिक्रमणांवर कारवाई करुन सुमारे विविध प्रकारचे १०० साहित्य नगरपलिकेने जप्त केले असून, बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान, भोर नगरपलिकेकडून आजपासून हद्द निश्चित करुन पुढील आठ दिवसांत बेकायदेशीर बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय शहरातील मंगळवार पेठेत तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळ उभारण्यात येणार असल्याचे भोर नगरपलिकेचे मुख्यधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात यांनी सांगितले.
भोर शहरातील रामबाग ते महाड नाका दरम्यानचा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुकान, हाॅटेलसह इतर अतिक्रमणे आहे. यामुळे वाहतूककोंडी होते. विशेषता चौपाटी परिसरात सतत वाहातूककोंडी होते. या अतिक्रमणांवर कारवाई कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वादात कारवाई होत नाही. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
२७ भोर
भोर शहरात अतिक्रमणांवर सुरू असलेली कारवाई.