पुणे: आम आदमी पार्टीचे (आप) सर्वेसर्वा, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १६ जूननंतर पुण्यात येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुक नियोजनासाठी म्हणून ते येणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान आप ने महापालिका निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रभागनिहाय बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.
मागील काही वर्षात आप ने शहरात चांगले संघटन उभे केले आहे. रिक्षा चालकांची तर त्यांनी स्वतंत्र संघटनाच बांधली आहे. त्याशिवाय अन्य वर्गातही त्यांचे कार्यकर्ते काम करतात. प्रामुख्याने सुशिक्षित युवकांना त्यांनी आपल्या पक्षाकडे वळवले असून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कामाला सुरूवात केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षादेशाप्रमाणे इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून काम केले. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र पक्षाने तसा निर्णय दिला नाही.
आता महापालिकेसाठी मात्र त्यांनी आधीच तयारी केली आहे. पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्यात काही आडकाठी येणार नाही असे त्यांचे पदाधिकारी सांगतात. राज्याचे कार्याध्यक्ष अजित फाटके, प्रचारप्रमुख रंगा राचुरे यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर बोलतील असे सांगण्यात येते. प्राथमिक तयारी म्हणून सध्या पक्षाच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या प्रभागात कार्यकर्ते तसेच असंघटित कामगार यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. स्थानिक समस्यांवर काम करावे असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे.
पक्षाचे प्रमुख अऱविंद केजरीवाल यांनी पुण्यात यावे, कार्यकर्त्यांना वेळ द्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. १६ जूननंतर ते जमेल असे वाटते. तोपर्यंत आम्ही शहरातील कार्यकर्त्यांना सक्रिय करत आहोत.- मुकुंद किर्दत- राज्य प्रवक्ते, आप