शहराच्या विकासासाठी रस्ते, पूल आणि इमारती बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. मात्र, ही झाडे वाचवून त्यांना दुसरे जीवन देण्याचा एक अनोखा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने पुढाकार घेऊन 'वृक्ष पुनर्रोपण अभियान' सुरू केले असून, या अभियानांतर्गत आतापर्यंत २१०० हून अधिक मोठी झाडे यशस्वीरित्या पुन्हा लावण्यात आली आहेत.
काय आहे हा उपक्रम?आर. एम. धारीवाल फाऊंडेशन गेल्या ४० वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. विकासकामांसाठी सरसकट झाडे तोडण्याऐवजी, ती काळजीपूर्वक काढून दुसऱ्या योग्य ठिकाणी पुन्हा लावली जातात. यामुळे पर्यावरणाची हानी टाळता येते आणि झाडांनाही नवसंजीवनी मिळते.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने राबवला जात आहे.
वृक्ष पुनर्रोपण का महत्त्वाचे आहे?एक मोठे झाड दररोज चार लोकांसाठी पुरेसा ऑक्सिजन तयार करते. प्रत्येक झाड वर्षाला १० ते ४० किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. योग्य पद्धतीने पुनर्रोपण केल्यास ८०% पेक्षा जास्त झाडे जगतात.
फाऊंडेशनने पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात आतापर्यंत २१०० हून अधिक झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे.
तुम्ही कशी करू शकता मदत?पुणे रिंग रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे हजारो झाडे तोडण्याची शक्यता आहे. हे काम कोणत्याही एका संस्थेसाठी खूप मोठे आहे. त्यामुळे फाऊंडेशनने नागरिकांना आणि कंपन्यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
> एका झाडाच्या पुनर्रोपणासाठी ५,००० ते ४०,००० रुपये खर्च येतो. तुमच्या आर्थिक मदतीने झाडांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल.
> पुनर्रोपण केलेल्या झाडाची दोन वर्षांसाठी देखभाल करण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता. यामुळे झाड जगण्याची शक्यता जवळजवळ १००% वाढेल.
> तुमच्याकडे मोठी जागा किंवा शेतजमीन असल्यास, तुम्ही पुनर्रोपण केलेल्या झाडांना आश्रय देऊ शकता.
> या अभियानाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित करा.
फाऊंडेशनचे म्हणणे आहे की, विकास आणि पर्यावरण संवर्धन दोन्ही सोबत घेऊन जाणे शक्य आहे. त्यामुळे, 'एकत्र येऊन झाडे वाचवूया आणि आपले भविष्य सुरक्षित करूया' या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन फाऊंडेशनने केले आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही www.rmdfoundation.org.in/tree-transplantation या वेबसाइटला भेट देऊ शकता.