चाकण : चाकण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १८मध्ये महिलेसाठी राखीव असलेल्या एका जागेकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत ८३.२४ टक्के मतदान झाले. एकूण १०९२ मतदारांपैकी ९०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सविता जयवंत रामाणे (वय ३८ वर्षे, रा. माळआळी, चाकण) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत या प्रभागाची निवडणूक स्थगित करून २९ नोव्हेंबरला घेण्यात आली. जनता शिक्षण संस्थेच्या येथील शिवाजी विद्या मंदिर प्रशालेमध्ये सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ९०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागातील महिलेच्या एका जागेसाठी शिवसेनेच्या सुजाता मंडलिक, राष्ट्रवादीच्या आरती प्रीतम परदेशी, भारतीय परिवर्तन सेना पुरस्कृत भापसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अपक्ष उमेदवार जयश्री शंकर सोनवणे व जुलेखा बाबूमियाँ काझी या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या.खेडचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मतराव खराडे व सहायक निवडणूक अधिकारी अशोक साबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील व त्यांच्या सहकार्यांनी चाकणसह मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या या मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)
एका जागेसाठी ८३.२४ टक्के मतदान
By admin | Updated: November 30, 2015 01:56 IST