लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रविवार पेठेत सोनेचांदीच्या व्यापाऱ्याच्या गाडीच्या बॉनेटवर ऑईल सांडल्याचा बनाव करुन त्याच्या गाडीतील ५५ लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्यांचा माग काढण्यात फरासखाना पोलिसांना यश आले. त्यासाठी त्यांनी तब्बल ७०० सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली आणि त्यावरून थेट कर्नाटकात जाऊन तिघांच्या मुसक्या आवळल्या.
शंकर लक्ष्मण आचारी ऊर्फ शेट्टी (वय ३५, रा. ता. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक), यादगीर लक्ष्मण आचारी, मेरी व्यंकटेश नायडू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार व मुख्य सूत्रधार व्यंकटेश नायडू, शांता लक्ष्मण आचारी, लक्ष्मण आचारी यांचा शोध घेतला जात आहे. याच प्रकारे त्यांनी कोथरुडमध्येही ७ लाख रुपयांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
करण माळी (वय ३५, रा. देहुरोड) या सोनेचांदी व्यापाऱ्याने रविवार पेठेतून दागिने खरेदी करुन ते ३१ डिसेंबरला घरी जात होते. त्या वेळी आरसीएम कॉलेजसमोर त्यांच्या गाडीवर ऑईल टाकले. गाडीतून ऑईल सांडत असल्याचा बनाव केला. त्यांना बाहेर बोलावून बोनेट उघडले. त्यादरम्यान दुसऱ्याने त्यांच्या गाडीतील ५५ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग चोरुन नेली होती.
यातील तिघा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपास सुरु केला. त्या वेळी पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण व आकाश वाल्मीकी यांना एका दुचाकीवरून संशयित जाताना दिसला. त्या तिघांचा घटनास्थळापासून थेट सासवडपर्यंत सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे माग काढण्यात आला. त्याच्यातील एक जण तेथे बांधकाम सुरु असलेल्या घरातून येताना दिसला. तेथील कामगारांकडे तपास केल्यावर त्याने एकाने फोन करण्यासाठी आपल्याकडून मोबाईल घेतल्याचे सांगितले. त्याच्याकडून तो मोबाईल नंबर मिळविला. पोलीस उपायुक्त कार्यालयातील अंमलदार शरद वाकसे यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करुन तो मोबाईल नंबर शंकर आचारी याचा असल्याचा व तो कर्नाटकमधील असल्याचे निष्पन्न झाले.
या धाग्यावरून पोलिसांनी कर्नाटकात जाऊन शंकर आचारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदार श्रीनिवास लक्ष्मण आचारी, यादगीर आचारी, हरीश शेट्टी यांनी मिळून सोनेचांदीची बॅग चोरल्याचे सांगितले. ही बॅग मेरी, व्यंकटेश नायडू यांनी कर्नाटकात नेल्याचे सांगितले. त्यावरुन लक्ष्मण आचारी व मेरी नायडू यांना अटक करण्यात आली आहे.
चौकट
७०० सीसीटीव्ही तपासणीतून टोळी उघड
कर्नाटक राज्यातील टोळी लहान मुलांच्या साहाय्याने गाडीवर ऑईल टाकून, अंगावर घाण टाकून, खाजखुजली टाकून नागरिकांची दिशाभूल करतात. त्यांची नजर चुकवून दुचाकी, चारचाकीतील बॅगा लंपास करतात. हे चोरटे विविध शहरांत जाऊन तेथे काही दिवस भाड्याने घर घेऊन चोरी करुन नंतर दुसरीकडे जात असतात. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, राजेश तटकरे, तसेच सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, अमोल सरडे, मोहन दळवी, सुदेश सपकाळ, सचिन सरपाले, आकाश वाल्मीकी, राकेश क्षीरसागर, मयुर भोकरे, अभिनय चौधरी, ऋषीकेश दिघे, महंमद हनीफ शौकत शेख, तुषार खडके, पंकज देशमुख, समीर पवार, शरद वाकसे, महावीर वलटे, निशा कुंभार, सुनीता आंधळे यांनी ही कामगिरी केली.