बारामती : ३ फूट उंचीची गाय, एक फूट उंचीचे श्वान पाहून सारेच शेतकरी अवाक होत होते. निमित्त होते. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषिक प्रदर्शनाचे.इंटरनेटच्या जमान्यातदेखील विविध वैशिष्ट्यपूर्ण जनावरे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नसल्याचे चित्र आहे. अत्यंत दुर्मिळ असणारी ही जनावरे या पशुप्रदर्शनात शेतकऱ्यांचे आकर्षण ठरली. अहो आश्चर्यच आहे, ही प्रतिक्रिया या ठिकाणी सर्वच शेतकऱ्यांच्या तोंडी होती. या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण जनावरे पाहण्यासाठी शेतकरी तासन्तास रेंगाळले होते. पशू प्रदर्शनात मूळ तमिळनाडू येथील तीन फूट उंचीची पोंगनूर गाय, एक फूट उंचीचे पिश्चर जातीचे श्वान, हलगीच्या तालावर नाचणारा घोडा, चार फूट लांबीची शिंगे असलेली पंढरपुरी म्हैस, साडेचार फूट उंचीचा बोकड, देवनी, लालकंधारी, खिलार, गीर,जाफराबादी म्हैस, कडकनाथ कोंबडी आदी जनावरे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. इंदापूर येथील रचना खिलार फार्मला केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पोंगनुर गाय भेट दिल्याचे तेथील कर्मचारी सुनील आतकरी यांनी सांगितले. ही गाय प्रतिदिन केवळ दोन लिटर दूध देते. मात्र, या गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर चक्क ५०० रुपये दराने आहे. आयुर्वेदिक औषधासाठी या दुधाला मागणी असल्याचे आतकरी यांनी सांगितले.या वेळी दुर्मिळ जनावरांबरोबर हलगीच्या तालावर नाचणारा, लंगडी खेळणाऱ्या घोड्याने उपस्थितांची वाहवा मिळविली. हलगीच्या तालावर त्याच्या प्रशिक्षकांच्या सूचना घोडा स्वीकारताना शेतकरी अचंबित झाले. फुटबॉल खेळणे, मुजरा करणे उपस्थितांना खुणावून जवळ बोलावणे आदी कसब घोड्याने दाखविले. ‘ सोनी’ नावाचा हा घोडा यावेळी चांगलाच भाव खाऊन गेला. तर चार वर्ष वयाचे अवघे एक फूट उंचीचे पिश्चर श्वानाची माहिती घेण्यासाठी यावेळी शेतकरी उत्सुक होते.कमी खर्चामध्ये उत्कृष्ट प्रकारे पीक कसे घ्यावे, याबाबत शेतकऱ्यांनी आवर्जुन माहिती घेतली. मत्स्यशेती पाहण्यासाठी व त्याबाबत माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांचा विशेष ओढा असल्याचे चित्र होते. शेतकरी विविध माशांची माहिती घेऊन ते खरेदी करण्यासाठी यावेळी नाव नोंदणी केली. तसेच विविध विषयांची माहिती घेतली.
३ फूट उंचीची गाय, एक फूट उंचीचे श्वान पाहून अचंबित
By admin | Updated: January 22, 2017 04:41 IST