कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या पहिल्या यादीत १६५३ नागरिक या योजनेचे लाभार्थी झाल्याची माहिती सरपंच गौरी गायकवाड यांनी दिली.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत १३५० आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. आता महामारीच्या काळात या योजनेत कोरोनाचा उपचार होणार असल्याने रुग्णांसाठी मोठी संजीवनी ठरणार आहे. केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आला आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो.
यादीतील कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना देखील या योजनेअंतर्गत फायदा होणार असून त्यासाठी त्यांना स्मार्टकार्ड काढणे अनिवार्य असणार आहे. या योजनेसाठी पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती गावातील ७८८ कुटुंबापैकी ४३० कुटुंबाचा सर्वे करून ती महिती नोंदणी करण्यासाठी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवली असल्याची माहीती कदमवकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी दिली.
या यादीमध्ये निवड झालेल्या नागरिकांपैकी कोरोना आजारातून बरे होऊन घरी आलेल्या नागरिकांनी रुग्णालयाचे बिल, बँक पासबुक, स्मार्टकार्ड हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायचे आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आपल्या परिसरात चांगल्या प्रकारे राबवावी यासाठी सरपंच गौरी गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य यांनी २०१८ पासून पाठपुरावा केलेला असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेशिवाय पंतप्रधान घरकुल आवास योजना, कोरोना काळात गहू, तांदूळ वाटप योजना व केंद्रच्या अनेक योजना या ग्रामपंचायतीत राबविल्या गेल्या आहेत.