पुणे : मतदानाच्या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केल्याने अनेक जण त्या दिवशी मतदानाला दांडी मारून चित्रपटगृहात तसेच सहलीला जातात. याच्या परिणामस्वरूप मतदानाची टक्केवारी घटते. त्यामुळे मतदान जनजागृतीबरोबरच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मल्टीप्लेक्स असोसिएशन आॅफ इंडियाने शहरातील कोणत्याही मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यास येणाऱ्या मतदारांना तिकीटदरात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित प्रेक्षकांना हाताच्या बोटावरील शाईचा ठिपका दाखविणे बंधनकारक असेल. याबाबतचे पत्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना गुरुवारी देण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे असून, या आगळ्यावेगळ्या सवलतीच्या निर्णयामुळे मतदानाच्या टक्केवारीत भर पडण्यास मदत होईल. पुणे महापालिकेसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडावे व लोकशाहीने दिलेला मतदानाचा मूलभूत हक्क बजवावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यावसायिक संघटनांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मल्टीप्लेक्स असोसिएशन आॅफ इंडियाने मतदानाच्या दिवशी जे प्रेक्षक मतदान करून चित्रपट पाहण्यासाठी येतील त्यांना तिकीटदरात १५ टक्के सवलत दिली जाईल, असे जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)
मतदारांना चित्रपटाच्या तिकिटावर १५ टक्के सवलत
By admin | Updated: February 17, 2017 05:07 IST