माणगाव : प्रकल्पांसाठी माझ्या कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन काही जण कारखानदार होणार आणि शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले. रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली.ठाकरे यांनी सुनील तटकरे यांना त्यांच्याकडील संपत्तीवरून लक्ष्य केले. गीतेसाहेब तुमच्यात आणि तटकरे यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. गीतेसाहेब तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत; पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.उद्धव ठाकरे म्हणाले, अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नाव केले, असे आमचे जुने नाते आहे. पाकिस्तान आमचा दुश्मन आहे तसा तुमचा दुश्मन आहे. जर उद्या युद्ध झाले पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही, धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना माझे आवाहन आहे की, देशासाठी एकत्र या. आमचे भाजपसोबत मतभेद होते ते वैयक्तिक नसून ते जनतेसाठी होते आणि आताही युतीसुद्धा जनतेसाठीच केलेली आहे. युतीही देव, देश आणि धर्मासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.उद्योगमंत्री सुभाष देसाई या वेळी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प कोकणच्या पर्यावरणाला हानिकारक होता म्हणून हद्दपार केला. १०० हून अधिक कंपन्या तटकरे यांच्या आहेत. ८०० एकर जमीन आपल्या नावाने आहे. धीरूभाई अंबानी यांच्या ३२ आणि तुमच्या १०० ही प्रगती नैसर्गिक आहे का? असा सवाल त्यांनी केला.
''जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध''
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 00:00 IST