मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून तपास सुरु आहे. या तपासादरम्यान सुशांत सिंग राजपूत ड्रग्स घेत असल्याचंही समोर आलं. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्सचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून बॉलिवूड, ड्रग्स आणि पॉलिटिशन यांची सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
या पत्रात अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयपूर्वी मुंबई पोलीस दोन महिन्यांपासून करत होती. या काळात तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी ३ तासाच्या आत ही आत्महत्या आहे असं विधान केले. त्यानंतर वेगवेगळी विधाने आणि ट्विट पाहिलं तर यातून स्पष्ट दिसून येते की, या प्रकरणात काहीही गडबड नाही फक्त आत्महत्या आहे अशाप्रकारे भासवण्यात येत होतं. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या दिशेने चौकशी घेऊन जावी याचे संकेत या ट्विट आणि वक्तव्यावरुन मिळत होते असा आरोप त्यांनी केला.
मुंबई पोलिसांनी राजकीय दबावामुळे आत्महत्येच्या २ महिन्यानंतरही एक एफआयआर दाखल केला नाही किंवा Inquest Enquiry च्या अंतर्गत मुंबई पोलीस तपासाचं नाटक करत राहिली. ही चौकशी करताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध ५० पेक्षा अधिक लोकांना पोलिसांनी बोलावून चौकशी केली. जेव्हा बॉलिवूडच्या लोकांना बोलावलं जात होतं तेव्हा सत्ताधारी पक्षातील मोठा नेता एक मंत्री पोलिसांना फोन करुन या कलाकाराचा जबाब नोंदवू नका, त्याचे स्टेटमेंट घेऊ नका अशाप्रकारे पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता असं अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, ही सर्व माहिती आम्ही सीबीआयला देण्यास तयार आहोत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्येमागील सत्य, बॉलिवूड, पॉलिटिशन्स आणि ड्रग्स यांचा भांडाफोड होऊ नये यासाठी राज्यातील गृह विभाग आणि महाविकास आघाडी सरकारमधील मोठा नेता प्रयत्न करत होते. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. या नेत्यांची भूमिका आणि सर्व गोष्टींचा खुलासा सीबीआयद्वारे तपासात केला जावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे.
सुशांत सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू हा गेले दोन महिने संपूर्ण देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात पाटण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा निर्णय बिहार सरकारने ४ ऑगस्ट रोजी घेतला होता. यानंतर पूर्वी कधीही पाहायला मिळाली नाहीत अशी अतिशय वेगाने चक्रे फिरली. तो दिवस उलटायच्या आत केंद्रीय गृह मंत्रालयाने बिहार सरकारची विनंती मान्य करून प्रकरणाची फाइल सीबीआयकडे देण्याचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास तसे कळविले होते. पण गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुरुग्राममधील मेदान्त इस्पितळात पूर्ण ‘बेड रेस्ट’ घेत असताना व सीबीआय हा विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नसूनही हे एवढे झटपट झाले तरी कसे? सीबीआय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते व त्या दिवशी तर पंतप्रधान मोदी राममंदिराच्या भूमिपूजनाला अयोध्येस जाण्याच्या तयारीत होते. ‘भिंतीला कान’ लावले असता असे कळले होते की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलले व इस्पितळात असलेल्या शहा यांनी तेथूनच चक्रे फिरविली. अमित शहा सीबीआयचे संचालक आर. के. शुक्ला यांच्याशी बोलले व अवघ्या पाच तासांत हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेलं.