रामटेकमध्ये भगवा की कडेलोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 04:22 AM2019-03-14T04:22:47+5:302019-03-14T04:23:09+5:30

युतीमुळे शिवसेनेने निश्वास सोडला। काँग्रेसकडून वासनिक पुन्हा मैदानात

Ramtek saffron ka kalelot? | रामटेकमध्ये भगवा की कडेलोट?

रामटेकमध्ये भगवा की कडेलोट?

Next

- जितेंद्र ढवळे

एकेकाळी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दोेन वेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक लोकसभा मतदार संघावर सध्या शिवसेनेचा ताबा आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला. वासनिक यांना तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकला. यावेळी रामटेकचा गड सर करण्यात कुणाला यश येते व कुणाचा कडेलोट होतो, याकडे वैदर्भीय जनतेचे लक्ष लध लागले आहे.

१९७७ ते २०१४ या ३७ वर्षातील १२ निवडणुकांवर नजर टाकली तर आठ वेळा काँग्रेस पक्षाच्या आणि चार वेळा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. या मतदारसंघात भाजपाचे प्राबल्य असल्याचा दाखला देत ही जागा ‘मोठा भाऊ’ म्हणून भाजपाला द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी करून सेनेला काही दिवसापूर्वी घाम फोडला होता. युती झाल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

जिल्हा परिषदेत युतीची सत्ता आहे. जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत आणि पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. आजवर भाजपाच्या खांद्यावर शिवसेना निवडणूक लढत आली आहे. यावेळीही भाजपने युती धर्म पाळल्यास सेनेला लोकसभेत ताकद मिळेल. दुसरीकडे या मतदारसंघात मोडणाऱ्या विधासभेच्या सहापैकी पाच जागेवर भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. गत वर्षी काटोल विधानसभेत भाजपाकडून जिंकलेले आशीष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या काटोलचा कौल लोकसभेत कुणाला जातो याकडे लक्ष लागले आहे.

गत पाच वर्षात स्थानिक निवडणुकांमध्येही काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला नाही. दिल्लीत ‘हेवीवेट’ मानले जाणारे मुकुल वासनिक पुन्हा एकदा काँग्रेसकडून येथे दंड थोपटणार आहेत. अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी रामटेकसाठी जिल्हा काँग्रेसकडे अर्ज सादर करून उमेदवारीवर दावा केला होता.

यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याचे चित्र समोर आले होते. मात्र वासनिक यांचे नाव पक्के झाल्याने हा वाद शमला आहे. जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी रामटेक विधानसभेतून लढण्याची तयारी चालविली असल्यामुळे पक्षाला आघाडी मिळवून देण्यात त्यांची व विधानसभेच्या इतर इच्छुक उमेदवारांचीही खºया अर्थाने परीक्षा होणार आहे. आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने काँग्रेसच्या सोबत राहील असे दिसते. कारण या मतदार संघात मोडणाºया काटोल विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून जनसंपर्काचे भांडवल तर काँग्रेसकडून विकास खेचण्यासाठी दिल्लीतील वजन या मुद्यांवर प्रचारयुद्ध रंगताना दिसेल.

सध्याची परिस्थिती
पुढे विधानसभेच्या निवडणुकीची लढाई असल्यामुळे युती व आघाडी धर्म दोन्ही बाजुने तेवढ्याच ताकदीने पाळला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लोकसभेत सेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल. गेल्यावेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५, ०५१ मते घेतली होती. बसपाचा यावेळचा उमेदवार कोण असेल याबाबतही उत्सुकता आहे. बसपाच्या उमेदवार दमदार असल्यास याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसेल.सध्या मात्र तसे चित्र नाही.
‘आप’च्या अंजली दमानियाने गेल्यावेळी विदर्भात राजकीय माहोल तापविला होता. रामटेकमध्येही ‘आप’चे प्रताप गोस्वामीने २५ हजारावर मते घेतली होती. मात्र यानंतर ‘आप’ने या मतदारसंघात फारसा प्रताप दाखविला नाही.
मागील निवडणुकीत या मतदार संघात मतदार संख्या १७ लाख ३१ हजार ४६२ होती. यावेळी १ लाख ६६ हजार १३८ मतदारांची भर पडली आहे. दीड लाखावरील हे नवे मतदार नेमकी काय भूमिका घेतात, यावरही मतदारसंघाचा राजरंग ठरणार आहे.

रामटेक लोकसभा मतदार
एकूण मतदार- 18,97,600
पुरुष- ०9,85,539
महिला- 09,12,061

२०१४ मध्ये मिळालेली मते
कृपाल तुमाने (शिवसेना)- 5,19,892
मुकुल वासनिक (काँग्रेस)- 3,44,101
किरण पाटणकर (बसपा)- 95,051
प्रताप गोस्वामी (आम आदमी पार्टी)- 25,889
गौतम वासनिक (अपक्ष )- 6,353

Web Title: Ramtek saffron ka kalelot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.