- सुदाम देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही पितृपक्षातच सुरू राहणार आहे. एरव्ही अर्ज दाखल करण्यासाठी पितृपक्ष कधी संपेल, याची इच्छुकांना प्रतीक्षा असते. यंदा मात्र कोणाची इच्छा असो की नसो, सर्वांना पितृपक्षातच अर्ज दाखल केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे इच्छुकांची थोडी धाकधूक वाढली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणूक रणधुमाळीही पितृपक्षातच होती. २०१४ मध्ये १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली होती. १५ आॅक्टोबरला मतदान आणि १९ आॅक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल लागला होता. त्यावेळी ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत पितृपक्ष होता. तशीच परिस्थिती यंदाही राहण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार १६ किंवा १९ सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर एक-दोन दिवसांनी अधिसूचना प्रसिद्ध होते. त्यानंतर ९ ते १० दिवसापर्यंत अर्ज दाखल करता येतात. १९ सप्टेंबरला किंवा त्याआधी अधिसूचना प्रसिद्ध झाली तर त्यानंतर दहा दिवसात २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तोपर्यंत पितृपक्ष संपलेला असेल. त्यामुळे पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या तारखा असू शकतील.
२९ सप्टेंबरला घटस्थापना आहे. आतापासूनच इच्छुकांनी या पितृपक्षाची धास्ती घेतलेली आहे. आधीच पक्षांतरामुळे धास्तावलेले इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मुहुर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. पितृपक्षात नेमका कोणता मुहूर्त चांगला असेल, याची चाचणी इच्छुकांकडून सुरू झालेली दिसते.