मुख्यमंत्री ठाकरेंसोबत नेमकी कोणती चर्चा झाली?; हात जोडत नितीन गडकरी म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Published: January 7, 2021 09:30 PM2021-01-07T21:30:00+5:302021-01-07T21:30:46+5:30

भाजप-शिवसेनेत वारंवार सामना रंगला असताना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गडकरी मातोश्रीवर

no political discussions with cm uddhav thackeray says bjp leader nitin gadkari | मुख्यमंत्री ठाकरेंसोबत नेमकी कोणती चर्चा झाली?; हात जोडत नितीन गडकरी म्हणाले...

मुख्यमंत्री ठाकरेंसोबत नेमकी कोणती चर्चा झाली?; हात जोडत नितीन गडकरी म्हणाले...

Next

मुंबई: महाराष्ट्र भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिवसभरात शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त आमदार, औरंगाबादचे नामांतर अशा अनेक विजयांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात कठोर टीका होत आहे. अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांनी एकाच दिवसात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मनोहर जोशींनंतर नितीन गडकरींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

मनोहर जोशी, उद्धव ठाकरेंच्या भेटींनंतर नितीन गडकरींनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात सुरू असलेले रस्ते प्रकल्प, त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं यावेळी गडकरींनी सांगितलं. 'ठाकरे कुटुंबाशी माझे जुने संबंध आहेत. आजची भेट ही राज्यात सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पांबद्दल होती. त्या बैठकीला काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. या भेटीत राजकारण अजिबात नव्हतं,' असं म्हणत गडकरींनी स्मित हास्य करत जोडले.

नितीन गडकरींचा शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांना वाकून नमस्कार; जोशी सरांची घेतली सदिच्छा भेट

उद्धव ठाकरेंना तुम्ही आधीपासून ओळखता. आता मुख्यमंत्री उद्धव यांची कामगिरी कशी वाटते, असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. त्यावर 'माझं आज काल राज्यात जास्त येणं होत नाही. आताही मी ९ महिन्यांनंतर राज्यात आलो आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी आहे याचं मूल्यमापन तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे करू शकता,' असं उत्तर गडकरींनी दिलं. माझ्याकडे रस्ते वाहतूक खातं असल्यानं अंमलबजावणी संचलनालयाकडून सुरू असलेल्या कारवायांची कल्पना नसल्याचं ते पुढे म्हणाले.

Web Title: no political discussions with cm uddhav thackeray says bjp leader nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.