मुंबई: माझा गेल्या ७ वर्षांच्या कारभाराचा रेकॉर्ड तपासून पाहा. मी जुन्या गोष्टी शोधून शोधून त्या दुरुस्त करण्याच्या मागे लागलो आहे. यातच माझा वेळ जात आहे. आता मी सर्व कामांची दुरुस्ती करत आहे. तुम्ही विरोधकांना दुरूस्त करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनेपंतप्रधान मोदींना रोकडा सवाल केला आहे. गेल्या सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमक्या कोणत्या गोष्टीत सुधारणा केली, अशी विचारणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून एकामागून एक ट्विट करत भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हल्द्वानी येथील सभेत जुन्या गोष्टी सुधारण्यात माझी सात वर्षे गेली असल्याचे वक्तव्य केले. पण सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली?, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले
पंतप्रधान मोदी यांनी या काळात एकतर अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करुन पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. पुढील एका ट्विटमध्ये, भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या?
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.