नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019मध्ये बेगुसराय लोकसभेच्या जागेवरून सीपीआय उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी कन्हैय्या कुमार यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी बेरोजगार आणि स्वतंत्र लेखक असल्याचं सांगितलं आहे. कन्हैय्या कुमार यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, तसेच स्वतःच घरही नाही. सीपीआयचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी प्रतिज्ञापत्रात एका खात्यात 50 हजार रुपये, तर दुसऱ्या खात्यात 1,63,648 रुपये असल्याचं दाखवलं आहे.तसेच म्युच्युअल फंडात 170150 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. 2017-18मध्ये कन्हैय्या कुमार यांची संपत्ती 6 लाख 30 हजार 360 रुपये होती. तर तीच 2018-19मध्ये त्याची एकूण संपत्ती 2 लाख 28 हजार 290 रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. कन्हैय्या कुमारनं पुस्तक विक्री आणि व्याख्यानांद्वारे पैसे कमावले आहेत. कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात धार्मिक तेढ निर्माण करणे, सरकारी कामात हस्तक्षेप करणे, अनधिकृत सभा घेणे आणि कलम 124 एचा भंग करून घोषणाबाजी करण्यासारखे त्यांच्यावर आरोप आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याआधी कन्हैय्या कुमारनं रोड शोही केला आहे. या रोड शोला अभिनेत्री स्वरा भास्कर, मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, जेएनयूच्या माजी विद्यार्थी नेत्या शेहला राशिद आदी उपस्थित होते. याप्रसंगी 'लेके रहेंगे आझादी' अशा घोषणाही देण्यात आल्या. कन्हैया कुमार भाजपचे उमदेवार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
'बेरोजगार' कन्हैय्या कुमारजवळ ना जमीन, ना स्वतःच घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:11 IST