...अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण

By प्रविण मरगळे | Published: February 11, 2021 01:40 PM2021-02-11T13:40:37+5:302021-02-11T13:42:37+5:30

NCP Supriya Sule criticized PM Narendra Modi: लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा काही भाग वाचून दाखविला होता

Farmers Protest: NCP Supriya Sule Target PM Narendra Modi over criticizing Sharad Pawar | ...अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण

...अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण

Next
ठळक मुद्देभाजपाने सुरुवातीला या कायद्यांना विरोध करुन सत्तेत आल्यानंतर याच कायद्यांची अमलबजावणी केलीशरद पवार यांनी जे पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्यात त्यांनी कृषी कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होतामी इथे शरद पवारांच्या भूमिकेवर बोलत नाही. त्यासाठी ते सक्षम आहेत.

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत असताना विरोधकांसह शरद पवार यांना टोला लगावला. नव्या कृषी कायद्यांच्या धोरणांना आधी पाठिंबा होता असं सांगत नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला होता.

त्यानंतर आता शरद पवारांची लेक खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलत असताना मोदी सरकारला जशास तसे उत्तर दिलं आहे, सुळेंनी मोदी सरकारच्या यू टर्नचा पाढाच वाचला. भाजपाने जीएसटी, मनरेगा आणि आधार युआयडी सारख्या योजनांना सुरुवातील आक्रमक विरोध करुन नंतर स्वतःच या योजना राबविल्या होत्या हा यू-टर्न नव्हता का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला.(NCP Supriya Sule Target PM Narendra Modi over criticism of Sharad Pawar)  

लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा काही भाग वाचून दाखविला होता. त्यावर बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना या मुद्यावर प्रतिवाद करु शकले असते. पण आमची ती संस्कृती नाही. त्यामुळे मी आता त्याला उत्तर देत आहे. शरद पवार यांनी जे पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्यात त्यांनी कृषी कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता आणि पूर्ण अभ्यास करुनच राज्यांनी त्यावर विचार करावा', असे म्हटलं होतं.

यू टर्नवर भाजपाची पोलखोल

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटी करप्रणालीला विरोध केला होता. युपीआयने आरटीआय, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षणाचा हक्क, नरेगा, नवीन कॉर्पोरेट कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणला होता. विकासाच्या कोणत्याही कायद्याला युपीएने एकतर्फी न आणता सर्वांशी चर्चा करुन विकासाचे कायदे आणले. भाजपाने सुरुवातीला या कायद्यांना विरोध करुन सत्तेत आल्यानंतर याच कायद्यांची अमलबजावणी केली अशी आठवण त्यांनी भाजपाला करून दिली.  

त्याचसोबत नरेगाचा विरोध भाजपाने सातत्याने केला. मात्र याच नरेगामुळे कोविड काळात अनेकांना रोजगार मिळाला, हे विसरु शकणार नाही. आधार कार्डला देखील भाजपाने टोकाचा विरोध केला. मात्र आज आधारला पुढे घेऊन जाण्याचे काम मोदी सरकार करत आहे. मोदी सरकारचा हा लेफ्ट टर्न, राईट टर्न आहे की यू-टर्न हे मला माहीत नाही. पण पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने आमच्या भूमिकेवर यू-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभत नाही, अशी घणाघाती सुप्रिया सुळेंनी टीका केली.

त्या पत्रावर त्यावेळी टीका का नाही झाली?

शरद पवार यांच्या पत्रावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर ते १० वर्ष कृषीमंत्री असताना कोणतेही आंदोलन का झाले नाही? त्या पत्राचा त्यावेळी विरोध का झाला नाही? मी इथे शरद पवारांच्या भूमिकेवर बोलत नाही. त्यासाठी ते सक्षम आहेत. मात्र त्यावेळी सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांनी चर्चेस सुरुवात केली होती, म्हणून त्यांना विरोध झाला नाही, असे ठामपणे सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला बजावले.

Web Title: Farmers Protest: NCP Supriya Sule Target PM Narendra Modi over criticizing Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.