चंदिगड - गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे (Farmers Protest) केंद्रातील मोदी सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला पंजाब (Punjab), पश्चिम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणामध्ये बसत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता हरियाणामधील भाजपा सरकार संकटात सापडले आहे. (Congress will bring a no-confidence motion against Khattar Government) हरियाणामधील मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा करत विरोधकांनी या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. (BJP government in crisis in Haryana due to Farmers Protest)शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच हरियाणामध्ये राजकारणही तापले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. हुड्डा म्हणाले की, राज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे काँग्रेस या सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. खट्टर सरकारमधील मित्रपक्षाचे आमदारच हे सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचे सांगत आहेत.