मुक्ताईनगर : माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला गतिरोधक ठरलेले विरोधी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन येथे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. तिकडे खडसे मात्र कालच सोमवारी मुंबई येथे पोहोचले आहेत.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील तापी -पूर्णा खोऱ्यातील वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकाच्या नुकसानीची त्यांनी पहाणी केली तत्पूर्वी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी खासदार रक्षा खडसे यांचे निवासस्थानी कोथळीत पोहोचले. त्यांच्यासोबत गिरीश महाजन, खासदार उन्मेष ,पाटील ,आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते. सुमारे २० मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात थांबले होते.फडणवीस खडसे यांच्या निवासस्थानी या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या खडसे आणि फडणवीस यांच्या मधील बेबनाव व त्यातून खडसे यांनी भाजपात असतांनाही वारंवार फडणवीस यांना लक्ष केले होते. खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतरही एकनाथ खडसे हे फडणवीस यांनी दिलेल्या राजकीय जखमांचे वारंवार उल्लेख करतात. या जखमा ताज्या असतांना आज फडणवीस यांची खडसे यांच्या घरी भेट राजकीय दृष्ट्या अनेक संकेत देत आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसेंच्या स्नुषा असून त्या भाजपच्या खासदार आहेत. रक्षा खडसेंच्या भेटीसाठीच फडणवीस हे खडसे परिवाराच्या घरी गेले होते असे सांगण्यात येते. एकनाथ खडसे हे मात्र मुक्ताईनगर येथील निवसस्थानी अधिक असतात तर रक्षा खडसे या कोथळीतील निवासस्थानीच अधिक असतात.
देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी कोथळीत तर एकनाथ खडसे मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:50 IST