नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : महाकुंभ मेळ्यासाठी जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या कारला अपघात झाला. यात एका बांधकाम व्यावसायिकासह त्याची पत्नी आणि अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. मध्यप्रदेशातील जबलपूरजवळ शनिवारी (दि. २५) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
विनोद नारायण पटेल (५०, ), शिल्पा विनोद पटेल (४७, दोघे रा. स्पाईन सिटी चौक, एमआयडीसी भोसरी) आणि निरू नरेशकुमार पटेल (४८, रा. भेळ चौक, प्राधिकरण निगडी) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नरेशकुमार रवजी पटेल (४८, रा. भेळ चौक, प्राधिकरण निगडी), असे जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
नरेशकुमार पटेल आणि विनोद पटेल हे एकमेकांचे मित्र होते. नरेशकुमार आणि त्यांची पत्नी निरु तसेच विनोद आणि त्यांची पत्नी शिल्पा हे चौघेही प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी इनोव्हा (क्र. एमएच १४ केएफ ५२००) या कारने जात होते. त्यावेळी मध्यप्रदेशातील जबलपूर जवळ महामार्गावरील पुलाच्या कठड्याला त्यांची कार धडकली. यात विनोद, शिल्पा आणि निरु यांचा मृत्यू झाला. गुजरातमधील अरवल्ली जिल्ह्यातील धनसुरा तालुक्यातील लालूकंपा या त्यांच्या मूळगावी सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेशकुमार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात कार पुलाच्या कठड्याला धडक्यालानंतर मोठा आवाज झाला. चक्काचूर झालेली कार चेसीसपासून वेगळी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने कार बाजूला घेतली.
महिन्याभरापूर्वीच मुलाचा विवाहसोहळा
विनोद आणि शिल्पा पटेल यांना प्रेम हा एकुलताएक मुलगा आहे. महिन्याभरापूर्वी प्रेमचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. त्यामुळे निश्चिंत झालेले विनोद आणि शिल्पा हे दाम्पत्य कुंभमेळ्याला जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. तर नरेशकुमार आणि निरु यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी विवाहित आहे.
बांधकाम क्षेत्रातून हळहळ
विनोद पटेल यांचा तुलसी ग्रुप तसेच नरेशकुमार यांचा नेक्सस ग्रुप नावाने बांधकाम व्यवसाय आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम क्षेत्रात त्यांची ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. या अपघातामुळे बांधकाम क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.