Pimpri Rasta Roko: महापालिकेने चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत भंगार दुकानांवर गुरुवारी (दि.३०) कारवाईला सुरवात केली. मात्र, या कारवाईला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध करत देहू-आळंदी रस्ता अडवल्याने रस्त्यांवर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. या भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील रहिवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. या संदर्भात ठोस कारवाई करण्याबाबत तेथील हाऊसिंग सोसायटीधारक, रहिवाशांनी महापालिका, पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत महापालिकेने चिखली, कुदळवाडी परिसरातील भंगार दुकाने, गोदाम तसेच, हॉटेल, बेकरी, पत्राशेड, वर्कशॉप अशा अनधिकृत असलेल्या पाच हजार अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा दिल्या होत्या.
तसेच १५ दिवसांत अनधिकृत पत्राशेड बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाकडून ते पाडण्यात येईल, असा इशारा नोटिशींद्वारे देण्यात आला आहे. बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने गुरुवारी सुरुवात केली. त्यास स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत रस्ता रोको केला. त्यामुळे काही काळ कारवाई थांबविण्यात आली होती. कारवाईला सुरवात होण्याआधीच बंद...महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाकडून गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास कारवाईला सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत कारवाई कारवाई बंद पाडली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.