पुणे : सोन्याच्या दागिन्यांची आॅर्डर देण्यासाठी मुंबईहून पुण्याला बोलावून घेऊन हॉटेलच्या खोलीमध्ये व्यापाऱ्याचा खून करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने पंजाबमधून जेरबंद केले. रास्ता पेठेतील हॉटेल सुंदरमध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या या खुनाचे गूढ एका आठवड्यात उकलण्यात यश आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.सिमरनजित सरदार गुरमितसिंग (वय २६), गुरविंदरसिंग दलजितसिंग (२६, दोघेही रा. सुलतानविंड रोड, अमृतसर, पंजाब) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी किरण बाबुलाल कोठारी (वय ३०, रा. वांका मोहल्ला, चीरा बझार, मुंबई) यांचा खून केला होता.गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना लॉजमधील सीसी टीव्ही फुटेज मिळाले. या फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलीस अमृतसरला पोहोचले. दोघांनाही ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडून एक किलो नकली सोन्याच्या नथनी, तीन मोबाईल, दागिने बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात करण्यात आले आहे. हा खून व्यावसायिक संबंधांमधील तणावातून करण्यात आल्याचेही भामरे म्हणाले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त जयंत नाईकनवरे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, रघुनाथ फुगे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
रास्ता पेठेतील खुनाचे गूढ उकलण्यात यश
By admin | Updated: January 31, 2015 01:05 IST