लोणावळा : गवळीवाडा नाका येथील गणेश कॉर्नर कॉम्प्लेक्समधील एस. आर. जनरल स्टोअर या दुकानात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटे दरम्यान चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. पीयूष आगरवाल यांच्या मालकीचे हे दुकान आहे. त्यांच्या वडिलांनी सकाळी ९ :३० वाजता दुकान उघडले असता, त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले.आगरवाल म्हणाले, ‘‘शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता आम्ही दुकान बंद करून घरी गेलो होतो. दुकानाच्या काउंटरमध्ये दीड ते दोन हजार रुपये होते. दुकानाच्या दुसऱ्या भागात तत्काळ मनी ट्रान्स्फर सुविधा केंद्र आहे. त्याच्या काउंटरमध्ये २० हजारांच्या आसपास भरणा करण्यासाठी आलेली रक्कम होती. चोरट्याने दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील टँटोच्या दुकानाच्या खिडकीमधून आतमध्ये प्रवेश केला.चोरट्याने शिडीने खाली येत देवघरासाठी लावलेली लाकडी फळी खाली पाडत दुकानात प्रवेश केला व दोन काउंटरमधून रोकड चोरत आल्या मार्गाने पोबारा केला. (वार्ताहर) चोरी झालेल्या प्रकारावरून संबंधित चोरट्याला दुकानाची योग्य माहिती असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. चोरट्याने दुकानाच्या शटरला धक्काही लावला नाही. दुकानात अनेक महागड्या वस्तू असताना केवळ रोकड पळवली आहे. रोकड काउंटर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहे त्या काउंटरलाही चोरट्याने हात लावलेला नाही. या सर्व प्रकरणाची माहिती घेत तसेच चौकातील इतर काही सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत शहर पोलीस तपास करीत आहेत.
लोणावळ्यातील दुकानात चोरी
By admin | Updated: February 20, 2017 02:14 IST