पिंपरी : तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन पंक्चरच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेसर चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोशी येथे घडली. राजु कांबळे (रा. मोहननगर, पिंपरी), विशाल कांबळे, बाळू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश किशोर लोंढे (वय २०, रा. बोरहाडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोंढे यांचे मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथील माऊली टी सेंटर शेजारी पंक्चरचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास लोंढे हे त्यांचे मित्र शंकर सुरवसे, विनोद विश्वकर्मा, गोट्या उर्फ पया कचरु ओव्हाळ यांच्यासमवेत दुकानाजवळ बसले होते. दरम्यान, आरोपी धारदार हत्यारासह त्याठिकाणी आले. तसेच गोट्याच्या भावाने राजु कांबळे याचे रिक्षाचे शिफ्टचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन लोंढे यांच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेसर मशीन घेवून आरोपी निघाले. त्यावेळी लोंढे यांनी त्यास विरोध केला असता आरोपींनी लोंढे यांच्या डोक्यात, पाठीवर व हातावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करीत १५ हजार रुपये किंमतीचे कॉम्प्रेसर चोरुन नेले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत तरुणावर वार करुन हवा भरण्याचा कॉम्प्रेसर चोरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 20:01 IST