आळंदी : आळंदीत पकडलेला साप सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या सर्पमित्राला अचानक सर्पदंश होऊन उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२ रा. आळंदी ) असे सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. निर्जनस्थळी कोब्रा जातीचा साप सोडताना त्यांच्या हाताला दंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार व लस देऊन पुढील उपचारासाठी वाय. सी. एम. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सर्पदंशानंतर वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्यामुळे स्थिती गंभीर झाली होती. तसेच दंश झालेल्या भागावर कोणतीही प्राथमिक उपचारात्मक कापडी किंवा अन्य बांधणी करण्यात न आल्याचे आढळले. राहुल स्वामी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत दुःख व्यक्त केले आहे. सर्पमित्र म्हणून त्यांनी अनेक वर्षे निसर्ग संवर्धनासाठी कार्य केले होते. त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.