संजय मानेपिंपरी-चिंचवड : निसर्गाशी नाते जोडलेल्या मुलींनी अनोख्या पद्धतीने भोसरीत बाल दिन साजरा केला. वडील सर्पमित्र असल्याने बालपणापासूनच सापांविषयीची भीती मनातून गेलेली, त्यामुळे साप पकडण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. विमल कदम, साक्षी त्रिभुवन या अवघ्या दहा वर्षे वयाच्या मुलींनी स्वत:ची बालसर्पमित्र अशी ओळख परिसरात निर्माण केली असून त्यांनी सर्पांविषयीचे गैरसमज दूर करण्यासंबंधीचा कार्यक्रम घेऊन अनोख्या पद्धतीने बाल दिन साजरा केला.सापांविषयी असलेली भीती आणि गैरसमज दूर व्हावेत. भोसरी येथील सर्पमित्र राजेश कदम यांनी त्यांच्या घराशेजारील जागा अनोख्या पद्धतीच्या बालदिन कार्यक्रमास उपलब्ध करून दिली. कार्यक्रमासाठी एकत्रित आलेल्या बालचमूंना त्यांनी विषारी, बिनविषारी सापांची माहिती दिली. एवढेच नव्हे तर साप कसे हाताळावेत याची प्रात्यक्षिके सादर केली. या मुलींनी आतापर्यंत ४० साप पकडले आहेत. कोणाच्या घरात, घराच्या आवारात साप दिसून आल्यास त्यांना बोलावले जाते. चिमुकल्या हातांनी ते साप पकडतात. पुढे सर्पउद्यान अथवा वनविभागाच्या अधिका-यांशी समन्वय साधून त्या सापांना निसर्गात सोडून दिले जाते. सर्पमित्र राजेश कदम यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले असून, त्यांची इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी कन्या सर्पमैत्रीण विमल ही देखील न घाबरता साप हाताळते. विमल कदम व सर्पमित्र बाबासाहेब त्रिभुवन यांची इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारी कन्या साक्षी त्रिभुवन या दोघीही साप पकडतात. एवढ्या लहान वयात साप हाताळण्याचे त्यांचे कौशल्य पाहुन नागरिक अवाक् होतात. त्यांच्या धाडसीपणाचे कौतुकही करतात. बालदिनाचे औचित्य साधून या दोघींनी सापांपासून शेतक-यांना होणारे फायदे, सर्पदंशाची कारणे, लक्षणे, सापांचे वास्तव्य, विषारी व बिनविषारी साप कसे ओळखायचे, यांसह त्यावरील प्राथमिक उपचार, सापांच्या विषांपासून तयार करण्यात येणारी औषधे याची माहिती दिली.
चिमुकल्या हातांनी हाताळले सर्प, बालदिनानिमित्त बाल सर्पमित्रांनी केले प्रबोधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 20:49 IST