पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फेरबदल करावे लागणार आहेत. त्यासाठी प्रयत्न सुरू असून, फेरबदलाचा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी दिली.आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दी भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीच्या आहेत. याचा विचार करता हद्दींमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बदल्या केले जात आहेत. आणखी अधिकाºयांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होतील. कामाच्या ठिकाणापासून घरापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील आयुक्तालयाचे काम वेगात सुरू आहे. लवकरच फर्निचरचे काम पूर्ण होईल.पूर्वीची पद्धत बंद : पोलीस आरोपीच्या घरीमनुष्यबळ व वाहनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. मनुष्यबळ व वाहने तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच काही गुन्ह्यातील आरोपीला यापूर्वी फोन करून ठाण्यात बोलाविले जायचे, आता ही पद्धत बंद केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला ठाण्यात हजर करायचे, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त म्हणाले. तसेच दाखल असलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास प्रलंबित ठेवायचा नाही. यासाठी सर्व जुन्या गुन्ह्यांची पडताळणी करण्याचे काम सुरू असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणार फेरबदल- आर. के. पद्मनाभन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:16 IST